बारामती : बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील युवा शेतकऱ्याने एका एकरात १२१ टन उत्पादन घेत उच्चांक नोंदवला आहे. अर्जुन मासाळ असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी अर्जुन याने शेतीत लक्ष घातले.पहिल्याच वर्षी त्याने केलेल्या शेतीप्रयोगाने उच्चांक केला.अर्जुन हा बारामती येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. शिक्षण घेत असतानाच शेतकरी कुटुंबात एकुलता एक असलेल्या अर्जुनने पारंपारिक शेती पध्दतीला फाटा देत आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबला. पहिल्याच प्रयत्नात त्याने मोठे यश मिळविले.
छत्रपती कारखान्याच्या गाळपासाठी मासाळ यांचा सोमवारी (दि. ९) ऊस नेण्यात आला. यावेळी उसाचे वजन १२१ टन भरल्याने अर्जुन मासाळ यांचा शेती प्रयोग परिसरात चर्चेचा विषय ठरला. अर्जुनला एकुण ७ एकर शेती आहे.त्यामध्ये त्याने द्राक्ष आणि ऊसशेती केली आहे.त्याने प्रथमच २६५ ऊसाची लागवड केली. त्यासाठी चार फुटी अंतरावर ऊस बेणे लावले. मायक्रोन्युट्रीन्सचा वापर , पाणी आणि खत व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी उच्चांकी ऊस उत्पादनाची किमया साधली. एका उसाला ४७ ते ४८ कांड्या पाहून ऊस तोडणी कामगार आश्चर्यचकित झाले. ऊस लागवड केल्यावर मासाळ यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून शेतीला पाणी दिले.तसेच ठिबक सिंचनाचा वापर करुन खते दिली. त्याचा फायदा या शेतीला झाला आहे.सरासरी ऊसउत्पादन ४० ते ६० टन प्रतिएकरी मिळते.मात्र, प्रयोगशील शेतीमुळे अनेक वर्षानंतर छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उच्चांकी १२१ टन प्रतिएकर ऊस उत्पादन मिळविण्यात एका युवा शेतकऱ्याला यश आले आहे. पिकाचा पोत पाहुन त्यामध्ये असणारी कमतरता तसेच औषध आणि खतांची मात्रा देण्याची समज त्याने आत्मसात केली.त्याचा परिणाम उच्चांकी उत्पादन मिळाले.
अर्जुन या युवा शेतकऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले , शेतकरी मुलांनी नोकरीच्या मागे न लागता शेती करावी. पारंपारिक शेती पध्दत बदलावी. नवीन संशोधन,शेती पध्दतीची माहिती करुन घ्यावी.‘झिरो बजेट ’शेती केल्यास फायदा निश्चितच होतो. शेतीला इतर उद्योगाच्या तुलनेने भांडवल कमी लागते.त्याचा फायदा करुन घ्यावा, असे आवाहन युवा पिढीला केले आहे.—————————————————