कडूस : येथील तरुणांनी शिवनेरीवरून पेटती शिवज्योत आणून प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर गावाचे दैवत भैरवनाथ मंदिर, बाजारपेठ, ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत ढोल-ताशाच्या व पारंपरिक वाद्यांच्या गजरात, शिवरायांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढत एक गाव-एक शिवजयंती उत्साहात साजरी केली.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करण्यासाठी आयोजक मंडळी कळकळीचे आवाहन करीत होते. शिवचरित्राचा धावता वेध घेणारा चित्ररथ मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. सनईचे मंजूळ स्वर, चौघड्याचे पडघम, ढोल-ताशांचा ठेका, तुतारीची गर्जना, भगव्या झेंड्याची मांदियाळी, शिवरायांच्या नावाने अंगावर शहारे आणणाऱ्या घोषणा यामुळे सगळा कडूसगाव शिवमय झाले होते. शिवाजीराजांचा जाज्वल्य इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचावा म्हणून प्रभाकर महाराज कराळे यांच्या प्रबोधनकारी व्याख्यानाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा रायगडावर महाराजांच्या समाधीचा शोध, रयतेच्या कल्याणासाठी अलिखित कायदेकानून, लोकशाही प्रधान राज्य कारभार, राजांची स्वराज्य संकल्पना याबाबतची अनमोल माहिती महात्मा फुलेंच्या लेखनाचा संदर्भ घेऊन, प्रेरणादायी विचार मांडले.