राजगुरूनगर (पुणे) :खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कैलास लिंभोरे तर उपसभापती विठ्ठल वनघरे यांची बहुमताने निवड झाली. वनघरे यांनी यापूर्वी बाजार समितीच्या उपसभापती पदासह संचालक पदही भूषविले आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक (दि. २४ रोजी) समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरमळमकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. आमदार दिलीप मोहिते पाटील विरोधात सर्वपक्षीय असे दोन पॅनल होते. आमदार मोहिते पाटील गटाला १० आणि विरोधकांना ६ जागा मिळाल्या होत्या. व्यापारी मतदारसंघाच्या दोन संचालकांपैकी एक आमदार मोहिते पाटील यांच्याकडे तर एक विरोधकांकडे गेले. त्यामुळे ११ विरोधात ७ असे बलाबल झाले. सभापती पदासाठी कैलास लिंभोरे, उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी अर्ज दाखल केले होते. तर सर्वपक्षीय गटाचे विजयसिंह शिंदे पाटील व सभापती पदासाठी व उपसभापती पदासाठी सुधीर भोमाळे यांनी अर्ज दाखल केले होते.
सभापतीपदी आमदार मोहिते पाटील समर्थक कैलास लिंभोरे यांची तसेच उपसभातीपदी विठ्ठल वनघरे यांची निवड झाली. लिंभोरे-वनघरे यांना प्रत्येकी ११ संचालकांची मते मिळाली. तर विरोधी गटाच्या विजयसिंह शिंदे पाटील यांनी सभापती पदासाठी तर सुधीर भोमाळे यांना त्यांच्या पॅनेलमधील ७ संचालकांनी मतदान केले. आमदार मोहिते पाटील सभापतीपदाची संधी असताना त्यांनी कार्यकर्त्यांना पदाची जबाबदारी दिली. पुढच्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उर्वरित संचालकांना संधी देणार असल्याचे मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी संचालक जयसिंग भोगाडे, अशोक राक्षे, कमल कड, विनोद टोपे, हनुमंत कड, रणजित गाडे, सयाजी मोहिते, महेंद्र गोरे तसेच विरोधी गटाचे संचालक विजयसिंह शिंदे पाटील, सुधीर भोमाळे, माणिक गोरे, क्रांती सोमवंशी, सोमनाथ मुंगसे, अनुराग जैद यांच्यासह सुरेखा मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिलबाबा राक्षे, अरुण चांभारे, पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, माजी सभापती अंकुश राक्षे, बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, संदीप सोमवंशी यावेळी समिती आवारात उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी भंडार गोलाची उधळण करीत, फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
खेड बाजार समिती आमदार मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अग्रगण्य आहे. या बाजार समितीत शेतकरी हिताला महत्त्व दिले जात आहे. यापुढेही आपण व आपले संचालक मंडळ बाजार समितीचा कारभार चांगलाच करतील. येणाऱ्या काळात विरोधकांच्या टीकेला विकास कामातून उत्तर दिले जाईल.
कैलास लिंभोरे (नवनिर्वाचित सभापती बाजार समिती खेड)
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व चांगल्या कामांना आम्ही सात संचालक प्राधान्य देणार आहे. चुकीच्या गोष्टी बाजार समितीत यापुढे घडू देणार नाही. मागील काळात बाजार समितीत अनागोंदी कारभार सुरू होता. मात्र यापुढे एक रुपयाचा भ्रष्टाचार सुद्धा खपवून घेणार नाही. चुकीच्या गोष्टी रेटून नेण्याचा प्रयत्न केल्यास शासन दरबारी प्रश्न मांडून वाचा फोडू.
विजयसिंह शिंदे पाटील (संचालक बाजार समिती खेड)