पुणे : ऑनलाईन चॅटरुम आणि मेसेंजर अॅपच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाल्यानंतर एका व्यक्तीने १२ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केले आहेत. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. याबद्दलची तक्रार पीडित मुलाच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलिसांत दिली. याप्रकरणी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी ओळख सांगून ऑनलाईन चॅटिंग करणाऱ्या या आरोपी व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काका' अशी फेक ओळख सांगत या आरोपीनं ८ मार्च रोजी मेसेंजर या मोबाईल अॅपद्वारे मुलाशी संपर्क केला होता. नंतर ९ मार्चला आरोपीने त्या अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला. यावेळी या मुलाचे आई-वडिल घरी नसल्यानं आरोपीने या मुलावर लैंगिक अत्याचार केले.
या घटनेची मिळाल्यानंतर पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर 'काका' नाव असलेल्या आरोपीच्या विरोधात सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच आरोपीचा शोध सुरु केला. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिवाजी गावरे यांनी ही माहिती दिली.