पुणे : फ्लॅटवर कर्ज असतानाही त्याची माहिती न देता फ्लॅट विकत देण्याचा बहाणा करुन निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एका पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मालोजीराव रंगराव काकडे (वय ५०) आणि मनीषा मालोजीराव काकडे (वय ३६, दोघेही रा. गंगाधाम, बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी तारा रामचंद्र घुगे (वय ६०, रा. बिबवेवाडी) यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालोजीराव काकडे व मनिषा काकडे यांचा गंगाधाम फेज १ मध्ये फ्लॅट असून तो विकायचा असल्याचे त्यांनी घुगे यांना सांगितले. त्यानुसार ४९ लाख रुपयांना विक्री करण्याचे ठरले. मात्र, त्यावेळी काकडे यांनी या फ्लॅटवर ६६ लाख रुपयांचे कर्ज घेतले असल्याचे फिर्यादी यांना सांगितले नाही. फ्लॅट विक्री रकमेपैकी २९ लाख रुपये घुगे यांनी काकडे यांना दिल्यानंतर या फ्लॅटवर कर्ज असल्याची माहिती घुगे यांना समजली. काकडे यांनी कर्जाची पूर्ण रक्कम भरली नसल्याने बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने खरेदी विक्रीचा व्यवहार करता येत नव्हता. फिर्यादी यांनी काकडे यांना दिलेले २९ लाख रुपये व त्यावरील व्याज परत न करता फसवणूक केली.