यवत : कला केंद्राच्या संचालिकेचा मुलगा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे दौैंड तालुक्यात वाखारी (चौफुला) येथील न्यू अंबिका कला केंद्रात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.नगर जिल्ह्यातील अमित काळे याने यूपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. अमित हा नगर जिल्ह्यातील कालिका कला केंद्राच्या संचालिका राजश्री काळे यांचा मुलगा आहे. तमाशा कला केंद्रात राहूनदेखील यूपीएससीसारख्या अवघड परीक्षेत यश संपादन करता येते, हे अमितने दाखवून दिले आहे, असे अंबिका कला केंद्राचे संचालक अशोक जाधव व जयश्री जाधव यांनी सांगितले.कोल्हाटी समाज म्हणजे केवळ नाचगाणी करणारी मंडळी, ही ओळख आता अमित काळे यांच्या यशामुळे बदलणार असल्याचे अंबिका कला केंद्रातील कलावंत सांगतात. कला केंद्रात राहून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या राज्यातील अनेक कलाकारांच्या मुलांचा तो आदर्श बनणार आहे. अनेक गोरगरीब आणि वंचित कुटुंबांतील हुशार मुले-मुली अमितकडून प्रेरणा घेऊन निश्चितच स्पर्धा परीक्षा देऊन आयुष्यात यशस्वी होऊ शकतात.कलाक्षेत्रात राहून काम करीत असताना कलाकारांचे मुलांच्या शिक्षणाकडे अनेक वेळा दुर्लक्ष होते. मात्र, आता कलाकार मंडळी मुलांच्या शिक्षणाकडे आवर्जून लक्ष देत आहेत. कलाकारांच्या मुलांना शिक्षणक्षेत्रात विशेष शिष्यवृत्ती असावी, यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव व जयश्री जाधव यांनी सांगितले.
कला केंद्राच्या संचालिकेचा मुलगा यूपीएससी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 3:07 AM