कळस : निसर्गाच्या लहरीपणामुळे परंपरागत शेतीला फाटा देत कळस (ता. इंदापूर) येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गुलाबाची शेती सुरू केली आहे. त्यांच्या मेहनतीतून फुललेली गुलाब शेती आता सुगंध पसरवू लागली आहे. या शेतकऱ्यांनी या आठवड्यात तब्बल ५० हजार गुलाब फुलांची विक्री केली असून, विशेष म्हणजे व्हॅलेंटाइन डेमुळे दरात दुप्पट वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. व्हॅलेंटाइन डेसाठी फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब हे सर्वाधिक पसंतीचे फूल असल्याने बाजारपेठेत त्याला चांगला भाव मिळाला. शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा उत्तम अभ्यास, विक्रीचे कुशल तंत्र आणि योग्य व्यवस्थापन याच्या जोरावर उच्च प्रतीचे गुलाब उत्पादन घेतले आहे. ग्लॅडिएटर गुलाबाची जास्त लागवडगुलाब शेती किमान सहा वर्षे टिकते, त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीची चांगली मशागत करावी लागते. कळस परिसरात प्रामुख्याने 'ग्लॅडिएटर' जातीच्या गुलाबाची लागवड केली जाते. हे फूल गडद लाल रंगाचे आणि मोठ्या दांड्याचे असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गुलाब शेतीतून आर्थिक स्थैर्यगुलाबास 'फुलांचा राजा' म्हणून ओळखले जाते. त्यापासून अत्तरे, सुगंधी तेल, गुलकंद यांसारखी मौल्यवान उत्पादने तयार केली जातात. तसेच, गुलाब फुले हार, गुच्छ, पुष्पसजावट आणि केशसजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर चांगला फायदा मिळतो. दर वाढल्याने उत्पादकांचा आनंदगुलाबाचे दर आकर्षक रंग आणि गुणवत्तेनुसार ठरतात. विशेषतः गणपती, नवरात्र, दिवाळी, शिक्षक दिन आणि व्हॅलेंटाइन डेच्या काळात त्याला मोठी मागणी असते. यंदा सरासरी दोन रुपये प्रति फूल असा दर मिळाला असताना, व्हॅलेंटाइन डेला बोरडेक्स जातीच्या गुलाबाला तब्बल चार रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा नफा दुप्पट झाला आहे. धनंजय मोहोळकर, फुल उत्पादक, कळस "गुलाब शेतीकडे गांभीर्याने पाहिल्यास ती एक फायदेशीर शेती ठरू शकते. योग्य नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो." गुलाब शेती - भविष्यातील एक महत्त्वाचा पर्यायनिसर्गाच्या लहरीमुळे पारंपरिक शेती अडचणीत आली असली, तरी कळस येथील शेतकऱ्यांनी गुलाब शेतीतून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. फुलशेतीला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता भविष्यात अधिकाधिक शेतकरी गुलाब उत्पादनाकडे वळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Rose Farming : कळसच्या शेतकऱ्यांनी गुलाब शेतीतून फुलवले यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 16:09 IST