नीरा (पुणे) : पिंगोरी (ता. पुरंदर) येथे शेतकऱ्यांच्या गोठ्यातील कालवडींवर (गाईचे वासरु) बिबट्याने हल्ला केला आहे. यामध्ये एक कालवड गंभीर जखमी झाली आहे. तर एक कालवड बिबट्याने ओढून नेली. शनिवारी रात्री एकच्या सुमारास भरवस्तीत असलेल्या गोठ्यात शिरून बिबट्याने हा हल्ला केला.
शनिवारी रात्री १ च्या सुमारास बिबट्याने पिंगोरी येथे हरिश्चंद्र दशरथ यादव यांच्या गोठ्यातील कालवडींवर हल्ला केला. यादव यांचे पुतणे नुकतेच जेजुरी एमआयडीसीमधून कामावरून घरी आले होते. कुत्र्यांच्या भुकण्यामुळे त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता. त्यांच्या चुलत्याच्या गोठ्यात जनावरे ओरडत असल्याने त्यांनी तिथे जाऊन पाहिले असता त्यांना बिबट्या दिसून आला. त्यांना पाहताच बिबट्याने कालवड घेऊन पळ काढण्यास सुरवात केली.
मिलिंद यादव यांनी इतर लोकांना मदतीला बोलावून बिबट्याच्या तावडीतून कलावडीची सुटका केली. मात्र या दरम्यान ती कालवड गंभीर जखमी झाली होती. तर गोठ्यातील आणखी एक कालवड या दरम्यान गायब झाली आहे. ती बिबट्याने नेली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पिंगोरी परिसरात मागील काही वर्षांपासून चार बिबटे वास्तव्यास आहेत. त्यामुळे या भागातील जनावरांवर अनेक वेळा असे हल्ले होत आहेत. वन विभागाकडून मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नाही. शेतकऱ्यांचे मात्र यामध्ये लाखभर रुपयाचं नुकसान झाले आहे.
पिंगोरी परिसरात अनेक वन्यजीवांचे वास्तव्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पेरणीनंतरही मोर आणि रानडुकरांचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तर आता जनावरेही सुरक्षित राहिली नाहीत. वनविभाग जरी नुकसानभरपाई देत असले तरी एक जनावर तयार करण्यासाठी शेतकऱ्याने मोठे कष्ट घेतलेले असतात. त्यावर त्याचे पुढील आर्थिक गणित अवलंबून असते. अशा प्रकारे जनावरांवर हल्ला झाल्यास ते संपूर्ण गणित कोलमडून जाते. त्यामुळे या भागातील शेतकरी आता त्रस्त झाले आहेत.