Kalicharan Maharaj: महाराष्ट्रातील नवीन सरकारने लवकरात लवकर धर्मकार्य करीत रहावे. आपली ५ लाख मंदिरे परत घेण्याचा प्रयत्न करावा. संपूर्ण गोहत्या बंदीचा कायदा बनवावा आणि त्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा कालीचरण महाराज यांनी व्यक्त केली. यासह कालीचरण महाराज यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
अजित पवार सरकारसोबत आले आहेत याबद्दल ते म्हणाले, दोन लोक भरपूर धार्मिक असतील, तर तिसरा नास्तिक आला तर तोही धार्मिक बनून जाईल. धार्मिक, अध्यात्मिक, हिंदूवादी लोकांच्या मध्ये येऊन तेही धार्मिक, हिंदूवादी बनतील, अशी आशा करतो, असा विश्वास व्यक्त करताना, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा, बाळासाहेब ठाकरेंचे मुद्दे सोडले, त्यामुळे लोकांच्या नजरेत काय राहिले, अशी टीका कालीचरण महाराजांनी केली.
समान नागरी कायदा झालाच पाहिजे
जोपर्यंत सीएए, एआरसी, युसीसी लागत नाही, तोपर्यंत जनतेने कर देणे बंद करून टाकावे. आपले पैसे 'त्या' लोकांसाठी नाहीत. घुसखोर व देशद्रोही आहेत, त्यांच्यासाठी आपले पैसे नाहीत. आपला पैसा हिंदू रक्षणासाठीच खर्च करा, असे आवाहन करीत समान नागरी कायदा झालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केली.
दरम्यान, अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे मंडईमध्ये बुरुड आळीत सुरु असलेल्या म्हसोबा उत्सवात दीप अमावस्येनिमित्त १ हजार दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला. यावेळी कालीचरण महाराजांच्या हस्ते म्हसोबारायांची आरती देखील करण्यात आली. ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी सुर्यवंशी, जाधव कुटुंबीयांनी कालीचरण महाराजांचे पाद्यपूजन केले. विविधरंगी फुलांनी साकारलेल्या २५ फूट उंचीच्या शिवशंकरांच्या आकर्षक पुष्पसजावटीमध्ये विराजमान झालेल्या म्हसोबारायांचे मंदिर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाले होते. शिवशंकरांच्या पुष्पप्रतिकृतीसोबतच अग्रभागी २ नंदी आणि २ त्रिशुळाच्या पुष्पप्रतिकृती देखील साकारण्यात आल्या आहेत, त्या देखील दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या.