तुषार भोंडवे चासकमान: खेड तालुक्यातील सातगाव पठार भागाला नंदनवन ठरणारे व आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण गुरूवारी पहाटे साडेतीन वाजता ओव्हरफ्लो होत शंभर टक्के भरल्याने धरणाच्या आठही सांडव्याद्वारे सकाळी ६ वाजता ७८ क्यूसेक्स वेगाने पाणी आरळा नदीत सोडण्यात आले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागांत विशेषत: कळमोडी धरण परिसरात धुवांधार पावसाने कळमोडी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरात सतत पावसाची संततधार सुरूच असून बुधवारी ( ता.१०) रोजी सकाळी कळमोडी धरणात ८१ टक्के असणाऱ्या साठ्यात एक दिवसात तब्बल १९ टक्क्यांनी वाढ झाली. कळमीडी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढत असून यामुळे आरळा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. यामुळे पाण्याचा वेग कमी जास्त होत असून आरळा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम भागांत मागील रविवारपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाची संततधार सुरू असून पावसाने धामणगाव सह परिसरातील ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. यामुळे कळमोडी धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली. कळमोडी धरण लवकरच पुर्ण क्षमतेने भरल्याने कळमोडी धरणातील सर्व पाणी चासकमान धरणाला मिळत असल्याने खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरणारे चासकमान धरण भरण्यास मदत होणार आहे.
खेड तालुक्यातील कळमोडी धरण भरले, आरळा नदीत विसर्ग सोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 12:41 PM
खेड तालुक्याच्या पश्चिम भागांत विशेषत: कळमोडी धरण परिसरात धुवांधार पावसाने कळमोडी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरले आहे...
ठळक मुद्देकळमोडी धरणात एक दिवसात तब्बल १९ टक्क्यांनी वाढ खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरणारे चासकमान धरण भरण्यास मदत होणार