ओतूर (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयन राजे भोसले यांच्या मातोश्री कल्पना राजे भोसले यांनी कडाक्याच्या थंडीत कुडकुडणाऱ्या कुत्र्याच्या लहान पिलाला रात्री दोन वाजता जीवदान देऊन आपली प्राण्यांप्रति असलेली भूतदया दाखवून समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कल्पना राजे भोसले या रात्री दोन वाजता संगमनेर मार्गे विमानतळ रस्त्याने साईबाबांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र शिर्डी येथे जात असताना विमानतळाजवळील रस्त्यावर त्यांना कुत्र्याचे एक लहान पिलू थंडीत कुडकुडत असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ आपल्या चालकाला वाहन थांबविण्यास सांगितले. अचानक वाहन थांबविण्यास सांगितल्याने चालक क्षणभर गोंधळून व घाबरून गेला.
आईसाहेब स्वतः गाडीतून खाली उतरल्या व चालत थंडीने कुडकुडणाऱ्या कुत्र्याच्या पिलाजवळ गेल्या. त्या मुक्या प्राण्याला स्वतः उचलून घेऊन पुन्हा गाडीत जाऊन बसल्या. रात्री दोन वाजता शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात गेल्यानंतर तेथील सेवकांना दूध आणावयास सांगून स्वतः त्या कुत्र्याच्या पिलाला ते दूध पाजून त्याला झोपविले. ते कुत्र्याचे पिलू झोपल्यानंतरच त्या झोपण्यासाठी गेल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी साईबाबांचे दर्शन घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासास जाताना त्या कल्पना राजे यांनी पिलाची चौकशी करून त्याची संपूर्ण जबाबदारी धोलवड (ता. जुन्नर, जिल्हा - पुणे) येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन नलावडे यांच्याकडे देऊन त्यांना त्या पिलाचे संपूर्ण पालन पोषण तसेच देखभाल करण्यास सांगून त्या मार्गस्थ झाल्या. कल्पना राजे भोसले यांचे प्राणीप्रेम तसेच कुत्र्याच्या लहान पिलाप्रति असलेला कळवळा पाहून त्यांचे सेवक, शासकीय विश्रामगृहातील कर्मचारी व त्यांच्या सोबत असणारे कार्यकर्ते अचंबित झाले असल्याचे दिसून आले.