पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुने फेरफार केल्यासंबंधी मुंबईतून दोन जणांना पुणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड अशी दोघांची नावे आहेत.
कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा पुणे पोलिस सखोल तपास करीत आहेत. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुने बदलण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. लोकसभेची धामधूम असतानाही शहरात हे अपघात प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत.
अवघ्या तीन लाख रुपयांसाठी अल्पवयीन मुलाचे रक्त नमुने बदलल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर थेट ससून रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर आला होता. या प्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांना अटक झाली आहे. पोलिसांच्या चौकशीत मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी माझ्या रक्ताचे नमुने दिले आहेत, अशी कबुली अल्पवयीन मुलाच्या आईने स्वत: पोलिसांना दिली. त्यानंतर या प्रकरणात मकानदार आणि गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.