पिंपरी (पुणे) : आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांची भरदिवसा कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना पुणे-आळंदी रस्त्यावर च-होलीजवळ मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या कांबळे यांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून कांबळे निवडून आले होते. त्यांचा भागीदारीत बांधकाम व्यवसाय आहे. आळंदी परिसरात चार ठिकाणी त्यांचे बांधकाम गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. पूर्ववैमनस्यातून त्यांच्यावर हल्ला झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील सारथी प्रकल्पाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पुण्यात असताना, भाजपाच्या एका नगरसेवकांवर हल्ला झाला आहे. त्यामुळे पुणे परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालल्याची चर्चा आहे.कांबळे यांच्यावरील हल्ल्याची बातमी पसरताच त्यांचे नातेवाईक, मित्र, कार्यकर्ते यांनी पिंपरीतील वायसीएममध्ये धाव घेतली. मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याने रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आळंदीमधील भाजपाचे नगरसेवक कांबळे यांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 6:44 AM