पुणे - एखाद्या पदार्थाची चव इतकी स्मरणात राहते की तो स्वाद आणि त्यातील मिठास कधीच विसरू शकत नाही.. अटलबिहारी वाजपेयीदेखील त्याला अपवाद ठरले नाहीत... कारण पुण्यात आल्यावर ’श्रेयस’कडे त्यांची पावले वळली नाहीत, असे कधी झालेच नाही. इतके महाराष्ट्रीय पदार्थांच्या ते प्रेमात पडले होते.कै. बाळासाहेब चितळे आणि अटलजी नागपूरच्या संघाच्या तिसऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाला एकत्र होते... त्यापासून चितळे कुटुंबीयांशी त्यांचे ॠणानुबंध जुळले आहेत. १९८० ते १९९६ या कालावधीत संघासह विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ते पुण्यात यायचे... त्या वेळी ते ‘श्रेयस’मध्येच उतरायचे.... कांदेपोहे, पुरणपोळीवर साजूक तूप, श्रीखंड आणि फुलके हे त्यांचे अत्यंत आवडीचे पदार्थ. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांची पंच्याहत्तरी आणि संपदा बँकेच्या कार्यक्रमानिमित्त अटलजी पुण्यात आले होते. पण आयोजकांनी त्यांची राहण्याची व्यवस्था हॉटेल ब्ल्यू डायमंडमध्ये केली होती. सकाळी सकाळी त्यांचा फोन आला की तातडीने मला कांदेपोहेचा डबा पाठव, तो डबा घेऊन त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांच्या खोलीबाहेर सुरक्षाव्यवस्था तैनात होती.कांदेपोहे हे शब्द त्यांच्या कानांवर पडताच त्यांनी मला लगेच आत बोलावले, असे श्रेयसचे मालक दत्ता चितळे अभिमानाने सांगत होते. १९८४ मध्ये पुण्यातच ‘श्रेयस’च्या हॉलमध्ये भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्व नेत्यांचे वास्तव्य श्रेयसमध्येच होते.अत्यंत साधी राहणी आणि अर्थपूर्ण व मार्मिक शैलीमध्ये भाष्य ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. या कार्यकारिणीच्या शेवटच्या बैठकीत त्यांचे स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर भाषण झाले. मात्र, मी पोहोचण्यापूर्वीच ते मुंबईला गेले. हॉटेलमधून निघताना त्यांनी श्रेयसबद्दल अभिप्राय लिहून ठेवला. त्यामध्ये ‘श्रेयस ने प्रेयस का रूप लिया है’’ असा उल्लेख त्यांनी केला... तो कागद आम्ही जपून ठेवला आहे.एकदा असेच पुण्यातील सभेमधले भाषण संपल्यानंतर त्यांना श्रेयसवर घेऊन चाललो होतो. आमची गाडी बालगंधर्व रंगमंदिराजवळ आल्यावर ‘इधर कौनसा नाटक चल रहा है, चलो हम देखेंगे’ त्यांना राजकारणातून काहीसा विरंगुळा हवा होता. परंतु त्या वेळी रात्रीचे ११ वाजले असल्याने शक्य नव्हते. नाटक, चित्रपटांचे ते चाहते होते... त्यामुळे ते हॉटेलवर असताना काही मराठी चित्रपट आम्ही त्यांना आवर्जून दाखवायचो.‘एक डाव भुताचा’ हा चित्रपट त्यांनी पाहिला होता. मात्र १९९६ नंतर पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे पुण्यात येणे कमी झाले... अशा आठवणींना चितळे यांनी उजाळा दिला.पुण्यातच १९५२ साली जनसंघाची स्थापना झाली होती. त्या कार्यक्रमाला अटलजी आले होते. प्रभात चित्रपटगृहात कार्यक्रम संपल्यानंतर बाबुराव किवळकरांच्या घरी त्यांच्याबरोबर जात असताना हिंदविजयजवळ रिक्षा बंद पडली. दोघेही उतरले. अटलजींच्या पायाला काहीतरी दुखापत झाली होती. दुसरी रिक्षा मिळाली नाही. बाबुरावांच्या खांद्यावर हात ठेवत कसेबसे चालत ते घरी पोहोचले. बाबुरावांच्या आईंनी दोघांनाही पाटावर बसवून गरम गरम भाकरी चुलीवर शेकवून वाढल्या... अशा अनेक अटलजींच्या स्मृती मनामध्ये ताज्या असल्याचे चितळे यांनी सांगितले.
अटलबिहारी वाजपेयी होते कांदेपोहे, पुरणपोळीचे चाहते!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 12:05 AM