लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “बेळगाव आणि कर्नाटकातील हिंसाचारामागे तेथील राजकीय लोक आहेत. बेळगावमधील काही फडतूस आणि किरकोळ संघटना कन्नड अस्मितेच्या नावाखाली मर्यादा सोडून चिथावणी देणारी परिस्थिती निर्माण करत आहेत. केंद्र सरकारने आणि कर्नाटकातील सत्ताधारी पक्षाने कठोर भूमिका घ्यायला हवी होती,” असे मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर गुुरुवारी (दि. २१) त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आणि अवहेलना करणारी वक्तव्ये कर्नाटकातील संघटनांकडून सातत्याने केली जात आहेत. बेळगावातील हिंसाचारामागे कर्नाटकातील राजकीय लोक आहेत. हा वाद ते मुद्दाम वाढवत आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकार प्रत्येक क्षणी कटिबध्द असेल. त्यांची वाट कोणीही अडवू शकणार नाही. आम्ही मराठी भाषिकांच्या बरोबर आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.