बारामती : झटपट पैसा मिळण्याचा एकमेव व्यवसाय म्हणून वाळूउपसा करणाऱ्यांची टोळीच तयार झाली आहे. वाळूउपसा करणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. मात्र, बारामती तालुक्यातील कऱ्हा, नीरा नदीपात्राची वाळूमाफियांनी चाळण केली आहे. वाळूउपशावर प्रतिबंध आणण्यासाठी बारामतीच्या तहसीलदारांनी आजअखेर ९९ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वाळूमाफियांकडून ३५ लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र, महसूल व पोलीस प्रशासनाला न जुमानता या दोन्ही नद्यांच्या पात्रातून अहोरात्र वाळूउपसा होत असतो. दोन आठवड्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे नीरा नदीचे पात्र पाण्याने भरले आहे. त्यामुळे काही भागांतील वाळूउपसा थांबला आहे. महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून अचानक कारवाई केली जाते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. बेसुमार वाळूउपशामुळे नदीचे पात्र रुंदावत आहे. त्याचबरोबर नैसर्गिक हानी होत आहे. अहोरात्र वाळूची वाहतूक होत असल्यामुळे नदीपात्रालगतच्या गावांमधून जाणाऱ्या रस्त्यांची चाळण होते. शेतकऱ्यांनादेखील वाळूमाफिया जुमानत नाहीत. रात्रीच्या वेळी उभ्या पिकातून वाळूने भरलेल्या गाड्या काढल्या जातात. बारामती तालुक्यात कांबळेश्वर, शिरष्णे, लाटे, शिरवली, सांगवी, खांडज, घाडगेवाडी, नीरा वागज, सोनगाव आदी परिसरातून नीरा नदीपात्रातील वाळूउपसा केला जातो. एप्रिलपासून आजअखेर ९९ गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३५ लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी खास पथकांची नेमणूक केली आहे. प्रतिब्रास २६ हजार रुपयांप्रमाणे दंड वसूल केला जातो. ------कऱ्हा नदीचे पात्रदेखील ठिकठिकाणी वाळूमाफियांनी पोखरले आहे. मोरगाव, काऱ्हाटी, बाबुर्डी, अंजनगाव, कऱ्हा वागज, नेपतवळण आदी भागांत वाळू उपशाला बंदी असतानादेखील मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जाते. त्यामुळे दोन्ही नद्यांचे पात्र रुंदावले आहे.वाळूमाफियांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे पाण्यात बुडून लहान मुलांचे प्राण गेल्याचे प्रकार झाले होते. वाळूउपशावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया बारामती तालुक्यातील शेतकरीवर्गातून होते. रात्री वाळूउपसा होत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत असते.
कऱ्हा, नीरापात्राची वाळूउपशाने चाळण
By admin | Published: October 01, 2015 1:06 AM