पुणे : नागरी प्रश्नांची जाण, पक्षाचे आदेश पाळून विविध विषयांवर पाठिंबा किंवा विरोध, वेळप्रसंगी आक्रमण भूमिका घेऊन आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरणारे नगरसेवक, अशी ख्याती असलेले तीन नगरसेवक आता पुणेलोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यात भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचे नाव जाहीर झाले असून, वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे शहरातील निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित झाले आहे.
गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्य करण्यास सुरुवात करणारे अनेक कार्यकर्ते हे पुढे जाऊन महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येतात. यात कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेले तीन नगरसेवक लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आहेत.
यातील धंगेकर यांच्या गळ्यात एक वर्षापूर्वी आमदारकीची माळ पडली. परंतु, अन्य दोन नगरसेवक हे महापालिका सभागृहापुरतेच मर्यादित राहिले. त्यांची ही कारकीर्ददेखील चांगलीच गाजलेली आहे. यात आक्रमक नेता म्हणून सर्वपरिचित असलेले वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला असला तरी, सोशल मीडियावर त्यांचे वलय कायम आहे. दुसरीकडे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा करिष्मा शहरात मोठा आहे. कोरोना आपत्तीतील त्यांचे काम आहे. तसेच त्यांची प्रतिमा व पक्षातील कार्यकर्त्यांमधील लोकप्रियताही दुर्लक्षित करण्यासारखी नाही.
या लढतीमध्ये सत्ताधारी पक्षाचे पारडे जड असल्याचे बोलले जात असले तरी, वसंत मोरे यांचे दक्षिण भागातील काम व कार्यकर्त्यांचा पाठिंबा, दुसरीकडे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघातून आमदारीकी मिळविणारे रवींद्र धंगेकर हे उमेदवार तडगे असून, भाजपला घाम फोडणारे आहेत. त्यामुळे शहरातील निवडणूक एकतर्फी होणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे, तर पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे प्रारंभी काँग्रेस व नंतर भाजपचे पारडे जड असणाऱ्या या मतदारसंघात यंदाच्या लढतीमुळे चांगलीच रंगत येणार आहे.
पक्षांतर्गत नाराजीचा तिघांनाही फटका :
१) भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक इच्छुक होते. पण, उमेदवारीची माळ मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात पडली. त्या दिवसापासून मुळीक यांची पक्षांतर्गत कार्यक्रमात अनुपस्थिती लागल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. मोहोळ यांची उमेदवारी अन्य पदाधिकाऱ्यांसाठीही डोईजड होईल, अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे मोहोळ यांना पक्षांतर्गत कुरघोडी किंवा नाराजांना आपल्याकडे वळविण्यासाठी काम करावे लागणार आहे. हीच गत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची आहे.
२) रवींद्र धंगेकर यांचा प्रवास हा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा राहिला आहे. त्यांनाच प्रथम आमदारकी आणि आता लाेकसभेसाठी उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमधील निष्ठावंत दुखावले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी तर उघडपणेच या उमेदवारीला विरोध केला आहे. निष्ठावंतांवर पक्ष अन्याय करीत आहे म्हणून माजी आमदारांसह ज्येष्ठ पदाधिकारीही धंगेकरांच्या प्रचारात किती मनापासून उतरणार, हाही एक मोठा प्रश्न आहे.
३) मनसेला जय महाराष्ट्र करून ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत असलेले मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि महापालिकेतील पक्षाचे माजी गटनेते वसंत मोरे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनाही मनसे पदाधिकाऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. पक्षाव्यतिरिक्तची आपली ताकद त्यांना या निवडणुकीत दाखवावी लागणार आहे. एकीकडे भाजप महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडी या दोघांशी सामना करत आपल्या पारड्यात अधिकाधिक मते मिळविण्यासाठी त्यांना मोठी झुंज द्यावी लागणार आहे.