केंदूर (पुणे) : करंदी (ता. शिरुर) येथे दुचाकीहून आलेल्या दोघांनी आम्ही पोलिस असल्याची बतावणी करत, दोघा इसमांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या लांबविल्याची घटना घडली. याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करंदी येथील नप्तेवस्ती येथे कुशाबा वाडेकर व त्यांचे नातेवाईक नागनाथ काटकर काही कामानिमित्ताने उभे असताना दुचाकीहून दोघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी आम्ही सीआयडी पोलिस आहे, काल येथे चोरी झाली, त्याचा तपास आम्ही करीत आहे, असे म्हणून वाडेकर यांचे खिसे तपासले.
दरम्यान, एका व्यक्तीने वाडेकर व काटकर यांच्यासमोर रुमाल धरून हातातील अंगठ्या रुमालात ठेवायला लावल्या आणि काही क्षणातच दुचाकीवरील दोघे जण दोघांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या घेऊन पळून गेले, याबाबत कुशाबा ज्ञानोबा वाडेकर (वय ६२, रा.बहुळ, ता.खेड) यांनी यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड करीत आहेत.