जेजुरी (पुणे): आज जेजुरीत सोमवती यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. सदानंदाचा येळकोट ,येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात राज्यभरातून आलेल्या भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. खंडोबा गडावरून आज सकाळी १२ वाजता सोमवती अमावस्येच्या यात्रेनिमित्त देवाच्या उत्सवमूर्ती कऱ्हा स्नानासाठी मानकरी, खांदेकरी व ग्रामस्थ मंडळांनी बाहेर काढल्या होत्या.
उत्सवमूर्तींचा हा पालखी सोहळा वाजत गाजत नंदी चौक, गौतमेश्वर, ग्रामदेवता जानुबाई मंदिर मार्गे शहराच्या मुख्य शिवाजी चौकातून कऱ्हा स्नानासाठी निघाला, सायंकाळी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा सोहळा कर्हेकाठी विसावला. या ठिकाणी देवाचे पुजारी, मानकरी आणि सेवेकऱ्यांनी उत्सवमूर्तींना विधिवत उत्सवमूर्तींना दही दुधाचा अभिषेक घालून स्नान घातले. महापूजा, आरती उरकून सोहळ्याने पुन्हा माघारीचे प्रस्थान ठेवले. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी ही देवाच्या उत्सवमूर्तींसोबत कऱ्हा स्नानाचे पुण्य मिळवले.
माघारीचे प्रस्थानावेळी सोहळा ठिकठिकाणच्या माणकर्यांच्या मान स्वीकारत ग्रामदेवता जानुबाई मंदिरात पोहोचला. मंदिरा समोरील प्रांगणात स्थनिक ग्रामस्थ, परिसरातील भाविकांनी देवांचे दर्शन उरकले. रात्री उशीरा सोहळा गडकोटात पोहोचला. रोजमुरा वाटपाने सोहळ्याची सांगता झाली.