चासकमान : भामा आसखेडमधून सोडण्यात येणारे पाणी सर्वपक्षीयांनी सोमवारी रोखल्यानंतर मंगळवारी कळमोडी धरणातून गेल्या तीन-चार दिवसांपसून होणारा विसर्ग तेथील ग्रामस्थांनी बंद केला. विनंती करूनही अधिकारी मानत नसल्याने त्यांनी धरणावरून जाऊन व्हॉल्व्ह बंद केला.७ नोव्हेंबर रोजी धरण प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांना पूर्व कल्पना न देताच कळमोडी धरणातून १९४ क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात केली. यावर ग्रामस्थांनी धरण अधिकाऱ्याला पाणी बंद करण्याची विनंती केली. परंतु, विनंती करूनही पाणी बंद न केल्यामुळे कळमोडी, चिखलगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. कळमोडी धरणाचे शाखा अभियंता बारवे यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता ग्रामस्थांनी पाणी बंद केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ग्रामस्थांबरोबर चर्चा करून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असे सांगितले.येथील सर्व ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय दूध धंदा आहे. पाणीच जर शिल्लक राहिले नाही, तर मुक्या जनावारांच्या पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यांनी काय मरायचे काय? असा सवाल ग्रामस्थांनी केला. लक्ष्मणराव मुके, बाळासाहेब गोपाळे, सदाशिव शेलार, गणपत गोपाळे, काशीनाथ गोपाळे, बाळशीराम गोपाळे, प्रभाकर गोपाळे यांसह दीडशे ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)1उन्हाळा अखेरीस दर वर्षी या धरणातून पाणी सोडले जायचे. मग या वर्षीच लवकर पाणी सोडण्याची बुद्धी का सुचली? हा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. आमच्या जमिनी पाण्यात गेल्या, त्याचा मोबदला अजून आम्हाला मिळाला नाही. आता आमच्या हक्काचे पाणी आहे, ते पळवा व आम्हाला उपाशी मारा, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
‘कळमोडीचे’ही पाणी रोखले!
By admin | Published: November 11, 2015 1:44 AM