पुणे - अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मार्केट यार्डमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. या हंगामातील हापूस आंब्याची चव घेण्यासाठी पुणेकर तयारीत असतानाच सध्या मार्केट यार्ड व शहराच्या गल्ली-बोळात आंबे विक्रेत्यांकडून रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील हापूस आंब्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे आपण विकत घेतलेला आंबा कोकणातला की कर्नाटक, असा प्रश्न सध्या पुणेकरांना पडत आहे. याकडे मात्र बाजार समिती प्रशासन व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांकडे एफडीएकडूनदेखील दुर्लक्ष केले जात आहे.सध्या आंब्याचा हंगाम जोमात सुरू झाला असून, फळांचा राजा हापूस आंबा अन् त्यातही देवगड, रत्नागिरी हापूस आंबा म्हटल की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये १० ते ११ हजार पेट्या कर्नाटक हापूसची आवक झाली आहे. तर रत्नगिरी व देवगड हापूसची ४ ते ५ हजार पेट्यांची आवक झाली. त्यामुळे सध्या पुणे शहरातील बाजारामध्ये रत्नागिरी, देवगड हापूस केवळ २० ते ३० टक्केच असून, ७० ते ८० टक्के आंबा हा कर्नाटक हापूस आंबा आहे. येत्या बुधवार (दि.१८) रोजी अक्षय तृतीयाचा मुहूर्त असून, या मुहूर्तावर हंगामातील आंबा खाण्यास सुरुवात करणाºया पुणेकरांची संख्या मोठी आहे. परंतु संध्या कोकणातील हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करून व्यापाºयांकडून पुणेकरांची फसवणूक केली जात आहे.गेल्या दोन-तीन वर्षांत पुणे शहरामध्ये सर्वत्र गल्ली-बोळांत रस्त्यांवर कर्नाटक हापूसची विक्री करणाºया किरकोळ विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. तसेच येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये देखील रत्नागिरी, देवगड हापूसचे केवळ ४ ते ५ होलसेल विक्रेते असून, कर्नाटक आंब्याची विक्री करणारे तब्बल १५ हून अधिक होलसेल व्यापारी आहेत. शहरात व मार्केट यार्डमध्ये देखील कर्नाटक हापूसची विक्रीदेखील सर्रास कोकणचा हापूस नाव असलेल्या बॉक्समध्ये केली जात असल्याने नक्की आंबा कुठला लक्षात येत नाही.रत्नागिरी व कर्नाटक हापूसच्या दरामध्येदेखील मोठा फरकअसतो. सध्या बाजारात रत्नागिरी हापूसचे दर ६०० ते ७०० प्रतिडझन असून, कर्नाटक हापूचे दर ४०० रुपयांपासून ६०० रुपये डझन एवढे आहेत. परंतु कर्नाटक हापूची विक्रीदेखील रत्नागिरीच्याच दराने केली जाते. यामुळे पुणेकरांची दुहेरी फसवणूक सुरू आहे.असा ओळखाकोकणातील हापूसरत्नागिरी, देवगड हापूसची साल पातळ असते. या तयार हापूसचा वरचा भाग केशरी लालसर रंगाचा असतो व पिवळा धमक रंग असतो,आकाराने थोडा गोलसर असा हा कोकणचा हापूस असतो.कोकण हापूस कापल्यावर आतमधून केसरी रंगाचा तर कर्नाटक हापूस कापल्यावर पिवळ््या रंगाचा दिसतो.खात्रीच्या व्यापा-यांकडून खरेदी करावीगेल्या काही वर्षांत पुणे मार्केट यार्डमध्ये कर्नाटक हापूसची आवक वाढत आहे. तसेच या हापूसचा दर्जादेखील काही प्रमाणात सुधारला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांला आंबा कर्नाटक हापूस आहे की रत्नागिरी हे सहज लक्षात येणे कठीण असते. यामुळेच ग्राहकांची फसवणूक होते. परंतु शहरात रत्नागिरी, देवगड आंब्यांची विक्री करणारे काही ठराविक विक्रेते आहेत. तसेच आपल्या भागातील नेहमीच्या व ओळखीच्या विक्रेत्यांकडून आंबा खरेदी केल्यास फसवणूक टाळता येऊ शकते.- रोहन उरसळ, फळ विक्रेते, मार्केट यार्ड
आंबा रत्नागिरी की कर्नाटक; होतेय फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 3:18 AM