लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: सगळ्या शहरात अस्वस्थता, अशांतता भरून राहिली आहे. भीतीने प्रत्येकाला घेरले आहे. काय करायचे हे कोणालाच कळेनासे झाले आहे. कर्तेच नाकर्ते झाले असून जनमानसावर प्रभाव टाकेल अशांचा अभाव प्रकर्षाने जाणवू लागला आहे. याआधी कधीही पुण्याची अशी अवस्था झालेली नसावी. याला जबाबदार कोण, असा प्रश्न यातून वर येत आहे.
सगळे शहर असे मरणासन्न होऊनही कर्ते म्हणवणाऱ्यांचे डोळे उघडायला तयार नाहीत. वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात ''गर्दी करू नका'' तर ''आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू'' च्या घोषणा होतात. यात लोकप्रतिनिधीची कोणती जबाबदारी आपण पार पाडतो आहोत याचेही भान घोषणा करणाऱ्यांना नाही. दर शुक्रवारी एक बैठक घेऊन त्यात थोडीफार दादागिरी केली की, संपले सर्व, अशीच बहुधा त्यांची भावना झाली असावी.
कार्यकर्त्यांना तर आभाळच ठेंगणे झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना म्हणणार महापालिका निष्क्रिय, तर भारतीय जनता पार्टीचे म्हणणे राज्य सरकार निष्क्रिय. राहता राहिलेले मनसे, आरपीआय सोयीनुसार टीकेच्या पिचकाऱ्या मारत आहेत. कोणी म्हणते राज्य सरकार बेकार, तर कोणी म्हणते केंद्र सरकारला आकस आहे. कोणी इथे दुगाण्या झाडतेय, तर कोणी आणखी कुठे! या सगळ्यात आपण पुणेकरांना वाऱ्यावर सोडले याचे भान मात्र कोणालाच राहिलेले नाही.
सांगणारेही सैरभैर झाल्यासारखे करताहेत आणि ऐकणारेही कानात वारे भरल्यासारखे उधळत आहेत.
एक महात्मा काहीतरी सांगायचा आणि सगळा देश हलायचा. एका लाल बहादूर शास्त्रींनी आवाहन केले व सगळ्या देशाने एकवेळचा उपवास केला. त्यांच्या बोलण्याला कृतीचा आधार होता, म्हणून त्यांच्या शब्दाला मान होता. आता मात्र असा जनमानसावर प्रभाव असणारा कोणी नेताच राहिलेला नाही. ना देशात, ना पुण्यात!
पुण्यात ऑक्सिजन बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर नाही, इंजेक्शन नाहीत, दवाखान्यांमध्ये खाटा मिळत नाहीत. रोजचे सात हजार रूग्ण सापडत आहेत, दररोज ४५ ते ५० जणांचे जीव जात आहेत, त्यात वयोव्रुद्ध आहेत तसे नुकतेच कुठे संसाराला लागलेलेही आहेत.
इतकी भीषण स्थिती येऊनही राजकारणी मात्र राजकारण करण्यातच मग्न आहेत. यांना सटकावून सांगणारा कोणीच शिल्लक राहिलेला नाही? यांचे डोके जाग्यावर आणेल असा कोणीच नाही?
असे कसे होईल? जनतेनेच आता ही जबाबदारी घ्यायला हवी. त्यांनी या सगळ्या लोकांना ठणकावून सांगायला हवे की, बास करा आता तूमचे हे बेजबाबदार वागणे! नाही पडणार आम्हीच कामाशिवाय घराबाहेर. गर्दी तर करणारच नाही. घेऊ काळजी आम्ही वैद्यकीय सल्ल्यानुसार. मास्क लावू आणि सुरक्षित अंतरही पाळू, राहायचे तर आमच्याबरोबर राहा, नाहीतर तुमच्याशिवायही आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. कोरोनाच काय प्लेग, देवी असल्या आजारांवरही आम्ही मात केली आहे. यावेळीही ती करूच!