आळंदी : संतश्रेष्ठ जगद्गुरू ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात कार्तिकी यात्रेला २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. कार्तिक वैद्य अष्टमीला गुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्यास सुरुवात होणार असून मुख्य पहाटपूजा ३० नोव्हेंबरला तर माऊलींचा संजीवन सोहळा २ डिसेंबरला पार पडणार आहे. तत्पूर्वी आळंदीतील कार्तिकीवारी लाखों वारकऱ्यांच्या उपस्थित साजरी होणार की नाही? याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत सूचना जारी करण्यात आली नसल्याने तमाम वारकऱ्यांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागलेले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षे माऊलींचा संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकीवारी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली आहे. तर आषाढीवारीही शासनाच्या नियमांना अधीन राहून मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत वाहनाद्वारे पूर्ण केली आहे. मात्र सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. तर अनेकांचे दोन्ही लसीकरण पूर्ण झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर पंढरीत भरणाऱ्या कार्तिकी यात्रेला शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदाची कार्तिकी यात्रा परंपरेनुसार दिमाखात साजरी होईल अशी आशा वारकऱ्यांमध्ये लागून आहे.
दरम्यान यंदाचा कार्तिकी वारी सोहळा शासनाच्या पूर्वपरवानगीने लाखों वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न व्हावा; असा प्रस्ताव जिल्हाधिकरी डॉ. विकास देशमुख यांच्याकडे दिवाळीपूर्वी सादर करण्यात आला आहे. अद्याप कार्तिकीवारी आयोजनाबाबत प्रशासनाकडून निर्णय जाहीर झाला नसला तरीसुद्धा यंदा परवानगी मिळेल अशी आशा वारकरी संप्रदायात दिसून येत आहे.
कार्तिकीवारीत सुमारे सहा ते सात लाखांहून अधिक भाविक दाखल होऊ शकतात
माऊलींचा संजीवन समाधी सोहळा अर्थात कार्तिकी उत्सव सात ते आठ दिवस चालणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक - भक्तांची मांदियाळी हा आनंददायी सुख सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी अलंकापुरीत हजेरी लावते. सलग दोन वर्षे आषाढी तसेच कार्तिकीवारी प्रत्यक्ष हजेरी लावून अनुभवता न आल्याने यंदाच्या कार्तिकीवारीत सुमारे सहा ते सात लाखांहून अधिक भाविक दाखल होऊ शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे.
शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा
आळंदीची कार्तिकीवारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र अद्यापही वारीच्या परवानगी बाबत निर्णय प्रलंबित आहे. कार्तिकी वारीची व्याप्ती मोठी असल्याने स्थानिक प्रशासन व देवस्थानला यात्रेची चोख तयारी करण्यासाठी किमान एक महिना अवधी लागत असतो. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. तद्नंतर आळंदीत येणाऱ्या दिंड्यांना देवस्थानकडून सूचना देणे सोयीचे होईल.