आळंदी : संतश्रेष्ठ श्री. ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात कार्तिकी यात्रेला ५ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. कार्तिक वैद्य अष्टमीला गुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्यास सुरुवात होणार असून मुख्य पहाटपूजा ९ डिसेंबरला तर माऊलींचा संजीवन सोहळा ११ डिसेंबरला पार पडणार आहे. दरम्यान सर्व अलंकापुरी या दिमाखदार सोहळ्यासाठी सज्ज होत असून नगरपालिका, देवस्थान व पोलीस प्रशासन वारीची तयारी करण्यात मग्न आहे. कार्तिकी सोहळ्याची मंगळवारी (दि.५) सकाळी ७ ते ९ या वेळेत हैबतबाबा यांचे वंशज ह.भ.प. बाळासाहेब महाराज आरफळकर - पवार यांच्या तर्फे हैबतबाबांच्या पायरीचे पूजन करून प्रारंभ होईल. दरम्यान सोहळा कालावधीत माऊली मंदिरात दररोज पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, महानैवेद्य, कीर्तन, धुपारती, जागर असे धार्मिक कार्यक्रम प्रथा परंपरांचे पालन करीत होणार आहेत. शनिवारी (दि.९ ) कार्तिकी एकादशी निमित्त रात्री साडेबारा ते पहाटे २ या वेळेत ११ ब्रम्हवृंदांच्या वेदमंत्र जयघोषात माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक व दुधारती होईल. दुपारी १ वाजता 'श्रीं'ची पालखी नगरप्रदक्षिणा होईल. रविवारी ( दि.१०) पहाटे साडेतीन ते चार या वेळेत खेडचे प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्या हस्ते पंचोपचार पूजा होईल. त्यानंतर दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत रथोत्सव मिरवणूक होईल. मंदिराच्या गाभाऱ्यात रात्री ११ ते १२ या वेळात खिरापत पूजा, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप होणार आहे. मंगळवारी (दि. १२) छबिना व ‘श्री’ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढून सोहळ्याची सांगता करण्यात येईल. कार्तिकी वारी सोहळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे - पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. भावार्थ देखणे, ऍड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या नेतृत्वाखाली पार पडेल. यापार्श्वभूमीवर माऊली मंदिरात सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. तर नगरपरिषद प्रशासन भाविकांच्या सोयीसुविधांची जय्यत तयारी करत आहे.
कार्तिकी वारी: आळंदीत लाखो भाविक होणार दाखल; तयारीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 9:42 AM