पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. सगळ्या वरिष्ठांचा फोन आला होता पण मी त्यांचे ऐकले नाही पण ज्यावेळी राहूल गांधींचा फोन आला त्यावेळी मी निवडणुकीतून माघार घ्यायचा निर्णय घेतला असल्याचे दाभेकर यांनी सांगितले.
कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून, या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून तीन इच्छुक उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली होती. त्यात रवींद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे यांचा समावेश हाेता. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस कसबा लढवण्यावर शिक्कामोर्तब झाला आणि रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर बाळासाहेब दाभेकर नाराज झाले होते. त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्याकडून प्रयत्न सुरू होते. आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, कमल व्यवहारे, अजित दरेकर, रफिक शेख, मेहबूब नादाफ यांनी दाभेकर यांच्याशी चर्चा करून मनधरणी केली. त्यानंतर गुरुवारी दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे, कमल व्यवहारे, अजित दरेकर आदी उपस्थित होते. दाभेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसमधील बंडखोरी शमली आहे.