पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुण्यातून काँग्रेसही लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे. या पोटनिवडणुकीच्या रिंगणात संभाजी ब्रिगेडने आपला उमेदवारही जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. चंद्रकांत पाटलांनी पोटनिवडणुकीत भाजपचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. निवडणूक बिनविरोध करावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करणार असल्याचेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
भोसरीतील इंद्रायणी थडी जत्रेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी महिला बचत गटाची चळवळ आणि महिला सक्षमीकरणावर त्यांनी भाष्य केले. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, दोन्ही विधानसभा निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांशी बोलणार आहे. त्यांनी अनेक वेळा विनंती केली. आम्ही ती मान्य केली आहे. आमची विनंती मान्य करायची की नाही त्यांनी ठरवावे. निवडणूक बिनविरोध करणे, आता तरी सगळ्यांसाठी उचीत राहील.
मंत्रिमंडळात महिलांना देणार स्थान
राज्यमंत्रिमंडळ विस्तार लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या महिला आमदारांना संधी मिळणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. इंद्रायणी थडीत आपण महिलांचे कौतुक केले. मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार का? यावर फडणवीस म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना शंभर टक्के स्थान देण्यात येणार आहे.’’