Maharashtra | कसब्यात ‘मविआ‘ची सरशी, चिंचवडला कमळ फुलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 11:41 AM2023-03-03T11:41:03+5:302023-03-03T11:41:11+5:30

कसब्यात कमळ कोमजले, चिंचवडमध्ये काटेरी लढतीत जगताप विजयी...

kasba and chinchwad bypoll result congress ravindra dhangekar bjp ashwini jagtap win | Maharashtra | कसब्यात ‘मविआ‘ची सरशी, चिंचवडला कमळ फुलले

Maharashtra | कसब्यात ‘मविआ‘ची सरशी, चिंचवडला कमळ फुलले

googlenewsNext

पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला. तब्बल ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला. कसब्यात कमळ कोमजले आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा गुलाल उधळला. तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी एक लाख ३१ हजार ४६४ मते मिळवून विजय साकारला आहे. तर राष्ट्रवादीचे नाना काटे ९६,१७५ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ५०.०६ टक्के मतदान झाले होते. गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतदान मोजण्यात आले. त्यात धंगेकर यांनी मतांमध्ये आघाडी घेतली. धंगेकर यांनी मतमोजणीच्या २० फेरी पूर्ण होईपर्यंत ही आघाडी कायम ठेवली. रासने यांना ६१ हजार ७७१ मते तर धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मते मिळाली.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विशेष करून प्रभाग क्रमांक १५ मध्ये सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी झाल्यावरही काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेत भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली खरी. मात्र, ती रवींद्र धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. हे अनपेक्षित आणि कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल. रासनेंना मिळालेली आघाडी धंगेकरांना मिळालेल्या कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ इथल्या आघाडीवर मात करू शकली नाही. अखेर भाजपचा पारंपरिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतला.

दुसरीकडे चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा प्रभाव कायम असल्याचेच अश्विनी जगताप यांच्या विजयाने स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्र्यांसह अर्ध मंत्रिमंडळ प्रचाराला, पण रासनेंचा पराभव

कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यात हजेरी लावली होती. अर्ध मंत्रिमंडळ प्रचाराला आलं होतं. मात्र, त्याचा फारसा फायदा हेमंत रासनेंना झाल्याचं पोटनिवडणुकीत दिसलं नाही. तब्बल ३० वर्षांनी भाजपचा पारंपरिक मतदारसंघ काँग्रेसनं हिसकावून घेतला आहे.

महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यासह मित्र पक्षांनी एकजुटीने काम केले. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ल्यात पराभव झाला. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अत्यंत जोरदार प्रहार केला.

तीस वर्षांनंतर इतिहास घडला

पुण्याचा कसबा मतदारसंघ काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी जिंकला आहे. लढत चुरशीची होतीच; पण ११ हजारांहून अधिक मताधिक्यांसह धंगेकर निवडून आल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे. १९९१ ची पोटनिवडणूक वगळता भाजपचेच या मतदारसंघावर प्राबल्य राहिले. गिरीश बापट पाच वेळा इथे आमदार होते. त्यानंतर मुक्ता टिळक या आमदार झाल्या होत्या. १९९१ च्या निवडणुकीत काँग्रेसचे वसंत थाेरात यांनी भाजपचे गिरीश बापट यांचा पराभव केला होता. पोटनिवडणुकीतील इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. तीस वर्षांनंतर कसब्यामध्ये इतिहास घडला आहे.

Web Title: kasba and chinchwad bypoll result congress ravindra dhangekar bjp ashwini jagtap win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.