पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशीच सर्वांची भावना आहे, मात्र महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी तसे होऊ नये याचे सूतोवाच केले आहे. हा मतदारसंघ भाजपचाच आहे व फक्त मताधिक्य वाढवण्याचे काम करायचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पाटील यांच्या निवासस्थानी कसब्याच्या पोटनिवडणुकीसंदर्भात बैठक झाली. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांसह शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पाटील यांनी यावेळी ही निवडणूक खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली व मुळीक यांच्या नेतृत्वात लढवली जाईल, असे सुरुवातीलाच जाहीर केले.
पाटील म्हणाले, पक्षाचे सर्व कार्यकर्ते कोरं पाकीट असतात. पक्षश्रेष्ठी जे नाव ठरवतील त्याचे काम निष्ठेने व प्रामाणिकपणे केले जाईल. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच निवडणूक बिनविरोध होऊ नये याचे सूतोवाच केले असल्याचे सांगितले. कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. इथले मतदार भाजपवरच मनापासून प्रेम करतात. त्यामुळे मताधिक्य वाढविण्यासाठीच कार्यकर्ते काम करणार आहेत, असे ते म्हणाले.