पुणे : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा शुक्रवारी थंडावल्या. पुणे शहर पोलिस आणि निवडणूक आयोगाची दडपशाही सुरू असल्याचा आराेप करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वात शनिवारी सकाळी १० वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या पोटनिवडणुकीच्या काळात पुणे शहर पोलिस व निवडणूक आयोगाने दडपशाही केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. याविरोधात पुकारलेल्या धरणे आंदोलनास कार्यकर्त्यांनी माेठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केले आहे.
भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप
पोलिसांच्या उपस्थितीत भाजप नेते, पदाधिकारी हे लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ही लोकशाहीची हत्या झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.