पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान झाल्यानंतरही शहरात जोरदार हवा आहे. गल्लीबोळ, चौकातील साध्या कार्यकर्त्यांपासून ते राजकीय पक्षांचे हितचिंतक असलेल्या बड्या पैसेवाल्यांमध्ये निकालाबाबत पैजा लागल्या आहेत. चहापासून ते रोख पैशांपर्यंतचा त्यात समावेश आहे.
पोटनिवडणुकीत कमी मतदान होते, दुपारी १ ते ४ पुणेकर, त्यातही शनिवार, सदाशिव, नारायण मधील अस्सल पुणेकर वामकुक्षीत असतात असे अनेक समज या पोटनिवडणुकीने खोटे ठरवले आहेत. वामकुक्षी घेणाऱ्या पेठांमध्ये नेमक्या त्याच वेळेत चांगले मतदान झालेले आकडेवारीवरून दिसते आहे. रविवारच्या सुटीची दुपारची झोप प्रिय असलेल्या पुणेकरांनी ती टाळून मतदान केल्यानेच या निवडणुकीच्या निकालाविषयी आता सगळीकडेच उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने दोघेही सार्वजनिक उत्सव, त्यातही गणेशोत्सव साजरा करण्यामधून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. दोघेही मतदार संघातच लहानाचे मोठे झालेले,दोघांनाही महापालिकेतील नगरसेवकपदाची पार्श्वभूमी, दोघांच्याही मागे पक्षाने फुल्ल ताकद उभी केलेली, त्यामुळेही या निवडणुकीत ती पोटनिवडणूक असूनही भलतीच रंगत आली. आता ही रंगत निकालाच्या प्रतीक्षेत आणखी वाढली आहे. त्यातूनच पैजांचा ‘फिवर’ तयार झाला आहे.
निकालाच्या रंगल्या चर्चा
कसबा अवघ्या २ लाख ७५ हजार मतदारांचा आहे, मात्र संपूर्ण शहरात या निकालाची चर्चा आहे. प्रत्येकजण आपापले अंदाज वर्तवीत आहे. कोणाला दोन्ही उमेदवार राहत असलेल्या प्रभागांमधील मतदानाची टक्केवारी दिसते आहे, तर कोणी पक्षातूनच एका उमेदवाराला खूप मोठा धोका झाल्याचे सांगत आहे. अशा चर्चांमधूनच पैजा लावल्या जात आहेत. अंदाजावर लागत असलेल्या या पैजा मजा म्हणून घेतल्या जात आहेत. त्यामध्ये एका चहाची पैजपासून ते रोख रक्कम देण्याघेण्याचा समावेश आहे. त्याला साक्षीदारही घेतले जात आहेत.