पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघ मागील २८ वर्षे भारतीय जनता पक्षाकडे आहे. त्यातलीही ५ वर्षे सत्तेची म्हणजे पालकमंत्रिपदाची होती, मग त्यावेळी पुण्येश्वर आठवला नाही का? आता विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव स्पष्ट दिसू लागल्यानेच त्यांना पुण्येश्वराची आठवण येत आहे; मात्र कसब्यातील मतदार याला भुलणार नाही. महाविकास आघाडीलाच मतदान करेल, असा विश्वास व्यक्त करत आघाडीने शुक्रवारी सायंकाळी प्रचाराचा समारोप केला.
उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीच माध्यमांबरोबर संवाद साधला. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, शिवसेनेचे संजय थरकुडे तसेच मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चौधरी व तिन्ही पक्षांचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. धंगेकर यांनी कसब्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
ते म्हणाले, भाजप युतीला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळेच ते जातीधर्माचे मुद्दे उकरून काढत आहेत. याच मुद्द्यावर ते राजकारण करतात, विकासकामांवर त्यांना बोलायला जागाच नाही, कारण तेच अनेक वर्षे इथे सत्तेत आहेत. काय केले ते त्यांनी जाहीरपणे सांगावे. सत्तेत नसतानाही नगरसेवक म्हणून, कार्यकर्ता म्हणून अनेकांची कामे केली, तेच लोक आता माझ्यामागे उभे राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदारकीची मुदत वर्षाची की दीड वर्षाची हे महत्त्वाचे नाही तर लोकांची कामे होणे, कसब्यासारख्या शहरातील सर्वाधिक जुन्या भागाचा विकास करणे, त्यासाठी आमदार म्हणून काम करणे महत्त्वाचे वाटते. जातीधर्मावर प्रचार करायला, मतदारांच्या भावना भडकावणे अशा प्रकारांना कसब्यातील सुजाण मतदार बळी पडणार नाही, असे धंगेकर म्हणाले. मोहन जोशी, शिंदे, जगताप, मोरे व अन्य वक्त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले.