Kasba By Election | जाहीर प्रचार संपला, छुपा प्रचार सुरू; कार्यकर्त्यांना द्यावा लागणार पहारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 08:38 AM2023-02-25T08:38:56+5:302023-02-25T08:39:49+5:30
या निवडणुकीच्या मतदानासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे....
पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या जाहीर प्रचाराची रणधुमाळी आज संपली. आता छुपा प्रचार सुरू झाला असून, कार्यकर्त्यांना पहारा द्यावा लागणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.
कसबा पोटनिवडणुकीसाठी १६ उमेदवार रिंगणात राहिले; पण थेट लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यातच आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी प्रचाराची राळ उडवून निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही रॅली काढली. धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रचाराचा समारोप केला.
७६ मतदान केंद्रे, नऊ संवेदनशील केंद्रे
या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. हे मतदान समर्थ, खडक, विश्रामबाग, फरासखाना आणि दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत होणार आहे. यासाठी ७६ मतदान केंद्रे असणार आहेत. त्यासाठीची प्रशासकीय यंत्रणांकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली असून, मतदानाच्या दिवशी कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीत नऊ मतदान केंद्रे संवेदनशील असून, तेथे अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.