पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पैसे वाटप करण्याच्या व्हिडीओमध्ये पोलिस अधिकाऱ्याची उपस्थितीचा प्रकार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोटनिवडणुकीत मतदारांना पैसे वाटण्याच्या तक्रारी करण्यात आल्या. प्रचार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी (२५ फेब्रुवारी) काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी लाक्षणिक उपोषण केले. पैसे वाटप करण्यात येत असल्याच्या दोन ते तीन व्हिडीओ प्रसारित झाल्या आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ गंज पेठेतील असून एका खोलीत पैशांचे वाटप सुरू असल्याचे दिसत आहे.
पैसे वाटप करणाऱ्याला नागरिकांनी पकडून ठेवल्याचे दृश्य त्यात आहे. रविवार पेठ परिसरातील एका इमारतीत पैशांचे वाटप केले जात असल्याचा आणखी एक व्हिडीओ प्रसारित झाली. कसबा पेठ भागात पैसे वाटप करण्यात आल्याचा व्हिडीओ प्रसारित झाली असून पोलिसांनी हे व्हिडीओ निवडणूक आयोगाकडे पाठविल्या आहेत.