पुणे : ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या प्रभागात प्रचारासाठी आले होते त्यावेळीच माझा विजय नक्की झाला होता, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दिली. कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये रविंद्र धंगेकरांचा विजय निश्चित झाला आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सोळाव्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर जवळपास ६ हजार ९५७ मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारत हा विजय पक्का केला आहे. कसब्यात १७ व्या फेरीअखेर १० हजार ३७१ मतांचे लीड मिळाले आहे.
कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. या मतमोजणीत रविंद्र धंगेकरांचा विजय निश्चित झाला आहे. कसब्यामध्ये महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात थेट लढत होती. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला होता.