Kasba By Election | विजय आमचाच! रासने, धंगेकर समर्थकांकडून दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:04 AM2023-02-27T11:04:42+5:302023-02-27T11:05:43+5:30
दिवसभरात आमचाच उमेदवार कसा विजयी होणार याविषयी दावे-प्रतिदावे...
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर व भाजप शिवसेना (बाळासाहेबांची) युतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या समर्थकांकडून आज दिवसभरात आमचाच उमेदवार कसा विजयी होणार याविषयी दावे-प्रतिदावे करण्यात आले.
कसब्यात सकाळी मतदानाला मंद प्रतिसाद मिळाला. दुपारी एक वाजेपर्यंत केवळ १८.५ टक्के मतदान झाले होते. यामुळे मुख्य उमेदवार असलेल्या दोन्ही गटाकडून मतदारांना बाहेर काढण्यासाठी शर्तीने प्रयत्न केले जात आहे. प्रत्येक बुथवर असलेल्या मतदार याद्या पाहून आपल्या परिचयातील मतदारांना घेऊन येण्यासाठी त्या-त्या ठिकाणचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना देत होते. याचवेळी अमूक एक प्रभागात मतदानाचा टक्का अधिक असल्याने आपल्याला कसा फायदा होणार असल्याची चर्चा होत होती. रवींद्र धंगेकर यांचा महापालिका निवडणुकीतील प्रभाग १६ मध्ये दुपारी तीनपर्यंत साधारणत: ४० टक्के मतदान झाले होते. हीच परिस्थिती हेमंत रासने यांच्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये होती. येथील मतदान आपल्याच पारड्यात पडणार, असा दावा दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांकडून होत होता.
प्रभागनिहाय याद्या व मतदारांना आणण्याची लगबग
भाजपसह महाविकास आघाडीच्या वतीने प्रत्येक बुथवर प्रभागनिहाय याद्या घेऊन उपस्थित असलेले कार्यकर्ते अधिकाधिक मतदार कसे येतील यासाठी प्रयत्नशील होते. कसबा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबतच दोन्ही बाजूने शहरातील अन्य भागातील माजी नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते मदतीला तैनात होते. यामध्ये उपनगरातील पदाधिकारी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
आमदार, माजी नगरसेवकांचे मतदान
भाजपचे तसेच महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार, माजी आमदार यांच्यासह सर्वच शहर पदाधिकारी आज दिवसभर कसबा विधानसभा मतदार संघात तळ ठोकून होते. पोलिसांनी कसबा विधानसभा मतदार संघात जे मतदार नाहीत अशा सर्वच राजकीय व्यक्तींनी तसेच राजकीय पक्षाशी संबंधित कोणतीही व्यक्तींनी कसबा विधानसभा मतदार संघात थांबू नये असे लिखित आदेश दिले होते. मात्र या आदेशाला सर्वांकडूनच केराची टोपली दाखविली गेली.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. गेली ३० वर्षे मी समाजकारण व राजकारणात सकारात्मक कामे करून जास्तीत जास्त विकासकामे केली. नागरिकांचा मतरूपी आशीर्वाद मला मिळाला असून, या आशीर्वादावर माझा व भाजप- शिवसेना मित्रपक्षांचा विजय निश्चित आहे.
- हेमंत रासने
कसबा मतदारसंघात मतदारांनी मला मोठे प्रेम दिले आहे. महाविकास आघाडीची ताकद व मतदारांनी मला दिलेला पाठिंबा तसेच त्यांच्या हृदयातील माझे स्थान यामुळे मी मोठ्या मताधिक्क्याने विजयी होईल.
- रवींद्र धंगेकर