Kasba By Election | कसब्यात मतदानासाठी पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल; भाजप नेते गणेश बीडकरांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:36 PM2023-02-27T12:36:18+5:302023-02-27T12:39:10+5:30
मतदानादिवशी भाजपचे काही कार्यकर्ते आणि नेते पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल...
पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदार झाले. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने आणि काँग्रसकडून रविंद्र धंगेकर आमनेसामने आहेत. या निवडणुकीत भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यासाठी मविआकडून मतदानाच्या अगोदर एक दिवस आंदोलनही करण्यात आले होते. प्रत्यक्ष मतदानादिवशी भाजपचे काही कार्यकर्ते आणि नेते पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्यानंतर भाजप नेते गणेश बिडकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मतदानादिवशी गणेश बीडकर पैसे वाटप करत आहेत. जो व्यक्ती व्हिडिओ काढतोय त्याला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत असल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. याप्रकरणी फैयाज कासाम शेख (वय ३८, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर, मयुर चव्हाण, नईम शेख, बाला शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील आएशा कॉम्प्लेक्स येथे रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला होता.
यातील तक्रारदार हे काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे माजी अध्यक्ष आहेत. ते मालधक्का चौक भागात त्यांचा मित्र याकूब बशीर शेख यांच्यासह फिरत असताना त्यांना काही भाजपा पक्षाचे कार्यकर्ते हे आएशा कॉम्प्लेक्स या ठिकाणी मतदारांना पैशाचे वाटप करीत आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्याचीच खात्री करण्यासाठी तिथे गेले असता तक्रारदार यांच्या तोंड ओळखीचे भाजपाचे नगरसेवक गणेश बिडकर, मयुर चव्हाण, नईम शेख, बाला शेख हे उभे असल्याचे दिसले व त्यांचे हातामध्ये केशरी रंगाची पिशवी तसेच मतदारांचे स्लिपा दिसल्या. या पिशवीमध्ये पैसे विचारणा केली असता भाजप कार्यकर्त्यांकडून फिर्यादींना शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली.