Kasba Bypoll, Mukta Tilak son Kunal Tilak reaction: पु्ण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकींचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे दिवंगत लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडी आणि अपक्ष आमदाराचा पराभव केला. कसब्यात मात्र गेल्या ३० वर्षांपासून विजयी होत असलेल्या भाजपाला पराभवाचा धक्का बसला. मुक्ता टिळक यांच्या निधनाने लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे हेमंत रासने यांचा महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांनी पराभव केला. मुक्ता टिळक यांच्या परिवारातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्याने भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला असा सूर या निकालानंतर दिसून आला. या साऱ्या चर्चांवर मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळकने प्रतिक्रिया दिली.
मुक्ता टिळक यांच्यानंतर त्यांचा मुलगा कुणाल टिळक याला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण तसे घडले नाही. कुटुंबामध्ये उमेदवारी असती तर कसब्यात भाजपासाठी वेगळं चित्र दिसलं असतं का? असा प्रश्न कुणाल टिळकला विचार आला. त्यावर तो म्हणाला- "आता हा प्रश्न विचारण्याची गरज नाही. उमेदवारी जाहीर झाली, आम्ही सगळे कुटुंबीय प्रचारात सामील झालो होते. देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, सगळ्या नेत्यांनी सभा घेतली. पण पराभव का झाला, याचा विचार करण्याची गरज आहे. ज्या चुका झाल्यात त्याचा विचार केला पाहिजे. आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलो होतो, त्यावेळी लोकांनीही भाजपला मतदान करणार असं सांगितलं. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रचार केला होता. आता कुठे तरी दुर्दैव म्हणावं लागेल कारण धंगेकर हे वेगळ्या प्रचारासाठी ओळखले जातात."
"भाजपाच्या कसब्यातील प्रचाराबद्दल म्हणत असाल तर पक्षश्रेष्ठींची कुठेही चूक झाली, असं म्हणता येणार नाही. सगळ्याच नेत्यांनी प्रचार केला होता. पण त्यात कुठे ना कुठे आम्ही कमी पडलो. विकासाचा अजेंडा असेल, विविध मुद्दे असू शकतील किंवा धार्मिक मुद्देही असू शकतील, त्या सगळ्याचा आता विचार केला पाहिजे. ब्राह्मण समाजातील उमेदवार नसल्याने फटका बसला असंही म्हणता येणार नाही. कारण आमच्याकडे जो रिपोर्ट आलाय त्यात नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठेत प्रामुख्याने ब्राह्मण समाज भाजपला मतदान करत असतो. पण यावेळी ब्राह्मण समाजाच्या मतदानाची संख्या कमी झाली आहे असेही समजले आहे," असेही कुणाल टिळकने सांगितले.