पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (ravindra dhangekar) यांचा विजय झाला आहे. त्यांची महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (hemant rasane) यांच्यात थेट लढत होती. तब्बल तीस वर्षानंतर काँग्रेसने कसब्यात पुन्हा मुसंडी मारली आहे. यापूर्वी १९९१ पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळाला होता. रविंद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत.
१९९२ ला कसब्यात पोटनिवडणूक झाली होती. त्यात काँग्रेस उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर २५ वर्षं गिरीश बापट आणि नंतर मुक्ता टिळकांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यापूर्वी १९७८ ला अरविंद लेले निवडून आले, तेव्हापासून १९८५ ची निवडणूक आणि १९९१ची पोटनिवडणूक हा अपवाद वगळता मतदारसंघ भाजपकडेच होता. कसब्यातून गिरीश बापट पाच वेळा आमदार झाले होते. या निवडणुकीत भाजपने प्रथमच ब्राह्मणेतर उमेदवार दिला होता.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात जोरदार जल्लोष सुरू केला आहे. हा जनतेचा विजय आहे. मी यापुढेही जनतेसाठी काम करत राहीन, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार रविंद्र धंगेकरांनी दिली.
पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे. मीच कुठेतरी कमी पडलो, विनम्रपणे मी निकाल स्विकारत आहे, अशी प्रांजळ प्रतिक्रिया रासने यांनी दिली. कसब्याच्या निवडणुकीकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले होते. त्यात अखेर महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकरांनी बाजी मारली आहे.