पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार याचीही उत्सुकता असणार आहे. मात्र याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत विरोधकांनी आपले उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनवोरध करा, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या जागेची पोटनिवडणूक ही बिनविरोध करायची ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या या आवाहनावर ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि त्या संस्कृतीची सध्या कशी रोज पायमल्ली होतेय, हे कोणी शिकवू नये. नांदेड आणि पंढरपूरमध्ये ही संस्कृती दिसली नाही, अंधेरीत दिसली त्याला वेगळी कारणं होती, असं संजय राऊतांनी सांगितले. मंगळावारी महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीत निवडणूक लढायला हरकत नाही, असा सूर आहे. जरी आम्ही निवडणुकीतून दूर राहिलो, तरीही ती होणारंच आहे. कारण काही अपक्ष निवडणुकीत उतरतील आणि निवडणूक होईल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचे निवडणुक आयोगाने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. या दोन्ही विधानसभा मतदार संघात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता मतदानाची तारीख बदलण्यात आली असून २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला ही निवडणुक पार पडणार आहे. तर २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेमुळे निवडणुकीची तारीख बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी- मंत्री चंद्रकांत पाटील
बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी; अशी सर्वांचीच भावना आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ नये; असा सुतोवाच केला आहे. त्यामुळे गाफिल न राहता ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.