पुणे : शहरातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उतरवला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी मागणीही केली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक दि. २६ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे अनेक इच्छुक आहेत. त्यांनी तशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. याबाबत भाजपने पाच जणांची नावे प्रदेश कार्यालयाला पाठविली आहेत. या पोट निवडणुकीच्या रिंगणात आता शिवसेना देखील उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कसबा पोटनिवडणूक लढवण्याची मागणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ठाकरे गटाची नुकतीच पुण्यात बैठक पार पडली. यात शहराध्यक्षांना उमेदवारी देण्याची इच्छा पदाधिकाऱ्यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे.
निर्णयाकडे सर्वांचे लक्ष :
शिवसैनिकांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, बैठकीनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर व्हायरल केले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून या उमेदवारीबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.