- राजू इनामदार
पुणे: चिंचवड विधानसभा मतदारसंघात दिवगंत आमदाराच्या घरात उमेदवारी, कसब्यात मात्र अनुकंपा तत्वाला फाटा असे भारतीय जनता पक्षाने का केले असावे याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पक्षाकडे काही ठोस कारणे होती, त्यामुळेच टिळक घराण्यात उमेदवारी नाकारली असल्याचे भाजपतील विश्वसनीय सुत्रांकडून सांगितले जात आहे.
चिंचवड मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला भाजपाने उमेदवारी दिली. कसब्यातही दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश, मुलगा कुणाल यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. माजी सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे व हेमंत रासने व अन्य काही जणांनीही कसब्यातील उमेदवारीवर दावा केला होता. पक्षाने बीडकर व घाटे यांनाही नाकारून हेमंत रासने यांचे नाव जाहीर केले. रासने स्थायी समितीचे माजी सभापती तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विश्वस्त मंडळाचे विश्वस्तही आहेत.
म्हणून नाकारली उमेदवारी
मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांच्या घराण्यातील होत्या, त्यांच्या घरातच उमेदवारी दिली जाईल अशी भाजप कार्यकर्त्यांची अटकळ होती, मात्र पक्षानेच ती खोटी ठरवली. शैलेश व कुणाल या दोघांचाही राजकीय अनुभव कमी आहे. मुक्ता टिळक यांना पक्षाने चार वेळा नगरसेवकपद, त्यानंतर महापौरपदही दिले. लगेचच आमदारकीसाठी उमेदवारी दिली. त्या पक्षात बरीच वर्षे कार्यरत होत्या. मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क होता. मात्र एकाच घरात वारंवार उमेदवारी दिली तर त्याचा स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना ते आवडणार नाही असे कारण पक्षाने दिले असल्याचे समजते.
हेही एक कारण
रासने यांच्या आमदारकीच्या उमेदवारीमुळे त्यांचा नगरसेवकपदाचा प्रभाग रिक्त होईल. त्या जागेसाठी पक्षातीलच एक वरिष्ठ ज्येष्ठ नेते आग्रही आहेत. त्यांना घरातील व्यक्तीचा या प्रभागातून राजकारण प्रवेश करायचा आहे. त्यामुळेच पक्षाला या मतदारसंघात प्रबळ वाटणाऱ्या दुसऱ्या एका पदाधिकाऱ्याच्या उमेदवारीला स्पष्ट नकार देत उमेदवारीसाठी त्यांनी रासने यांच्याच पारड्यात मत टाकले असल्याची माहीती पक्षातील सुत्रांनी दिली.
नाराजी दूर करण्यासाठी प्रदेशवर नियुक्ती
खुद्द शैलेश व कुणाल टिळकही आता निवडणुकीच्या प्रचारात कितपत रस घेतील याविषयी भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या मनात शंका आहेत. तसे होऊ नये यासाठी भाजपने कुणाल यांना थेट पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदावर नियुक्ती दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैलेश यांची थेट त्यांच्या घरी जाऊन शुक्रवारी रात्री भेटही घेतली, मात्र तरीही टिळक पितापुत्रांची नाराजी लपून राहील असे दिसत नाही.