पुणे/किरण शिंदे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असं स्वरूप या निवडणुकीला प्राप्त झाले आहे. भाजपच्या हेमंत रासने यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांचं तगडं आव्हान आहे. याच रवींद्र धंगेकरांनी 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापट यांना घाम फोडला होता. धंगेकरांचं बलस्थान म्हणजे तगडा जनसंपर्क आणि त्यामुळेच की काय भाजपचे धाबे दणाणले आहे. सध्या कसबा पोटनिवडणुकीत विविध पक्षांची कशी परिस्थिती आहे त्यासाठी वाचा सविस्तर...
मागील 25 ते 30 वर्षापासून कसब्यात भाजपचं एक हाती वर्चस्व आहे. आधी बापट आणि त्यानंतर मुक्ता टिळक यांनी कसब्याचं प्रतिनिधित्त्व केले आहे. मात्र मुक्ता टिळकांच्या निधनानंतर भाजपने पहिल्यांदाच या मतदारसंघात ब्राह्मनेतर उमेदवार दिला आहे. पहिली ठिणगी इथेच पडली. पक्षाचा पारंपारिक मतदार असलेला ब्राह्मण समाज या निर्णयाने नाराज झाला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून या समाजाने आपली नाराजी व्यक्तही केली आहे. तर दुसरीकडे ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आनंद दवे यांनी देखील भाजपविरोधात रान उठवले आहे. या सर्व घडामोडी पाहता ही निवडणूक भाजपसाठी सोपी नसल्याच्या चर्चा सध्या पुण्याच्या राजकारणात सुरू आहेत. त्यामुळेच भाजपने आपली दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरवली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे यांच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी तर भाजपच्या नेत्यांसोबत पुण्यातच सात तास मॅरेथॉन बैठक घेतली. त्याआधी पुण्यातील दोन मोठ्या उद्योगपतींसोबत बंद दाराआड देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा देखील केली. या संपूर्ण घडामोडी पाहता भाजपने या निवडणुकीसाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावण्याचे चित्र सध्या तरी दिसून येते.
दुसरीकडे भाजपचे चाणक्य समजले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते. या दोन दिवसात त्यांनी पुणे शहरातील पाच ते सहा कार्यक्रमांना हजेरी लावली. या दरम्यान त्यांनी कसबा पोटनिवडणुकी संदर्भात एकदाही उल्लेख केला नाही. मात्र त्यांनी छुपा प्रचार जरूर केला. अमित शहा यांनी आपल्या दौऱ्यात पहिल्याच दिवशी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली. शैलेश आणि कुणाल टिळक यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी कसबा मतदारसंघातील ओंकारेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतलं. यावेळी अमित शहा यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. अमित शहा जेव्हा मंदिरातून बाहेर पडले तेव्हा जय श्रीरामच्या घोषणांनी मंदिराचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
त्यानंतर अमित शहा यांनी अंथरुणाला खिळून पडलेल्या गिरीश बापट यांची ही भेट घेतली. त्यांच्या भेटीचे हे फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे अमित शहांच्या या भेटीगाठींचं टाइमिंग पाहता प्रचाराच्या मैदानात न उतरता त्यांनी देखील कसब्यात छुपा प्रचार केल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच रवींद्र धंगेकरांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. पदयात्रा करत मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर सध्या त्यांचा जोर आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी कसब्यासाठी मतदान होणार आहे तर 2 मार्च हा निकालाचा दिवस आहे. त्यामुळे अटीतटीच्या होणाऱ्या या लढतीत भाजपची सरशी होणार की धंगेकर बाजी मारणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे.