पुणे/किरण शिंदे : पुण्यात सध्या कसबा विधानसभा पोट निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. या पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न दिल्याने येथील ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. अशातच नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिराजवळ ब्राह्मण समाज नाराज असल्याचे काही फ्लेक्स लागले होते. या फ्लेक्सवरून खळबळ माजली होती. त्यानंतर आता हे फ्लेक्स लावणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई किरण राजेंद्र शिंदे यांनी या प्रकरणी तक्रार दिली असून विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"आमचेही ठरले, धडा कसा शिकवायचा, कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा, का काढला आमच्याकडून कसबा, आम्ही दाबणार NOTA" अशा वर्णनाचा फ्लेक्स मोदी गणपती जवळील विजेच्या खांबाला लावला होता. ब्राह्मण समाज व इतर समाज यांच्यात तेढ अथवा शत्रुत्वाच्या देशाच्या किंवा दुष्काळाच्या भावना हेतुपुरुष पर वाढविण्याच्या उद्देशाने हा फ्लेक्स लावल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात लागलेल्या या फ्लेक्सवरून भाष्य केले होते. हे बॅनर ब्राह्मण समाजाने लावले नाहीत. हे बॅनर कोणी लावले ते लवकरच सर्वांसमोर येईल असे ते म्हणाले होते. त्यानंतर आता विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक बरुरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.