कसबा विधानसभा पोटनिवडणूक: काँग्रेसला हवीय संजीवनी अन् भाजपला जपायचीय प्रतिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 12:20 PM2023-02-17T12:20:44+5:302023-02-17T12:21:53+5:30

भाजपने थेट उपमुख्यमंत्र्यांचाच आधार घेतला, त्याचबरोबर राज्यातील मंत्रीही मतदारसंघात आणले...

Kasba Vidhan Sabha by-election: Congress wants Sanjeevani and BJP wants to preserve its reputation | कसबा विधानसभा पोटनिवडणूक: काँग्रेसला हवीय संजीवनी अन् भाजपला जपायचीय प्रतिष्ठा

कसबा विधानसभा पोटनिवडणूक: काँग्रेसला हवीय संजीवनी अन् भाजपला जपायचीय प्रतिष्ठा

googlenewsNext

- राजू इनामदार

पुणे: कसबा विधानसभेची पोटनिवडणूक अशा वेळेला होत आहे की त्यानंतर लगेचच महापालिका, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाला चांगलेच महत्त्व आले आहे. पुढच्या निवडणुकांसाठी काँग्रेसला इथून संजीवनी हवी आहे तर भारतीय जनता पक्षाला आपली तब्बल ३० वर्षांची प्रतिष्ठा जपायची आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी चांगलाच जोर लावण्यात आला आहे.

भाजपने थेट उपमुख्यमंत्र्यांचाच आधार घेतला. त्याचबरोबर राज्यातील मंत्रीही मतदारसंघात आणले. त्याशिवाय इतर सहकारी पक्षांची बेरीज केली. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नसल्याची नाराजी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश व मुलगा कुणाल यांनाच प्रचारात उतरवले. बॅनरबाजीला प्रत्युत्तर न देण्याचे शहाणपण दाखवले. ‘हा तर आपला बालेकिल्ला’ असे समजून गाफील न राहता बालेकिल्ला अधिक मजबूत करण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे. सर्वपरिचित असा उमेदवार देऊन आता त्याला सर्व प्रकारची राजकीय मदत करून उजळून टाकण्याचे काम ते करत आहेत. त्यासाठी प्रचारफेऱ्या, पदयात्रा हे नेहमीचे उपाय तर आहेच, शिवाय मतदारसंघातील वेगवेगळ्या गटांच्या स्वतंत्र बैठका घेत, त्यांना पक्षातील बड्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासने देत हे गट बांधून घेण्याची चतुराई दाखवत आहेत.

महाविकास आघाडीत ३ पक्ष आहेत. ताकदही तीन पट दिसायला हवी. भर निवडणुकीत माध्यमांसमोर वादावादी करण्याचे वृथा धाडस काँग्रेसचे नेते दाखवतात हे आश्चर्यजनक आहे. तरीही त्यांच्या उमेदवाराचे सतत लोकांमध्ये असणे ही त्यांच्या जमेची बाजू आहे. मात्र सहकारी पक्षांना धरून राहणे, त्यांना राजकीय महत्त्व देणे, त्यांचे नेते सतत बरोबर राहतील याची काळजी घेणे हेही त्यांनी करायला हवे. ३० वर्षांची मक्तेदारी मोडून काढणे सोपे काम नाही. संजीवनी मिळवायची तर त्यासाठी कष्टही तेवढेच करायला हवे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना यांनाही कसब्यात विजय मिळाला तर संजीवनीच मिळणार आहे. मतदारांना जाग आणण्याचे काम त्यांच्याकडून अधिक प्रभावीपणे व्हायला हवे.

राजकीय साठमारीत कसब्यासारख्या पुण्याचे हृदय असलेल्या मतदारसंघाचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. वाहतुकीची कायमची कोंडी, वाहनतळांचा अभाव, ऐतिहासिक वास्तूंकडे झालेले दुर्लक्ष, नागरिकांसाठी पोहण्याचा तलाव, महिलांसाठी गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे अशा साध्या गोष्टीही या मतदारसंघात नाहीत. महाविकास आघाडी, भाजप या प्रमुख उमेदवारांसह अन्य काही अपक्ष उमेदवारही निवडणुकीत आहेत. त्यांनी या समस्यांवर नागरिकांबरोबर बोलण्याचे धाडस दाखवावे. तोच खरा प्रचार होईल.

Web Title: Kasba Vidhan Sabha by-election: Congress wants Sanjeevani and BJP wants to preserve its reputation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.