पुणे : पोटनिवडणुकीत काँग्रेस व सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ही परंपरा कसब्याने याही निवडणुकीत कायम ठेवली. २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. २८ वर्षे भाजपकडे असलेला मतदारसंघ खेचून आणला वगैरे गोष्टी झाल्या, पण ते तत्कालीक होते, हे आता सिद्ध झाले. रासने यांनी पराभूत झाल्यापासून केलेली अथक मेहनत त्यांच्या कामी आली, तर आमदार झाल्यापासून आमदारकीपेक्षा अन्य विषयांमध्ये लक्ष घालून त्यावर रान माजवण्यासारखा प्रकारही नागरिकांना न आवडणे हेही त्यामागे कारण असू शकते.
लोकसभा निवडणुकीतच मतदारांनी त्यांना इशारा दिला होता. त्यांनी तो मानला नाही. हा पराभव त्यांच्यापेक्षाही ते ज्या काँग्रेस पक्षात आहेत, त्या पक्षाला आत्मचिंतन करायला लावणारा आहे. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने पोटनिवडणुकीत केली, तशी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीच नाही. कोणालाही त्याचे गांभीर्य नव्हते. त्यामुळे बंडखोरी झाली, होऊ द्या. कोणी काम करत नाही, नको करू द्या, अशा वृत्तीनेच पक्ष काम करत होता. त्याचा फटका त्यांना बसला. पक्षाची म्हणून जी काही मते होती, ती फार मोठ्या संख्येने धंगेकर यांना पडलीच नाहीत.
स्थानिक नेतृत्वाने ना काँग्रेस म्हणून ही निवडणूक लढवली, ना महाविकास आघाडी म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व उद्धवसेना (उद्धव ठाकरे) यांचे कोणीही कार्यकर्ते वा पदाधिकारी धंगेकर यांच्याबरोबर दिसत नव्हते. काँग्रेसनेही त्यांना बोलावले नाही. प्रचाराच्या सुरुवातीची पत्रकार परिषद व प्रचार थांबला, तेव्हाची पत्रकार परिषद याचवेळी काय ते सगळे एकत्र दिसले. तेही फक्त नेते. कार्यकर्ते नाहीच.
१९ हजार ४१३ मतांनी काॅंग्रेस पराभूत
पोटनिवडणुकीत ११ हजार मतांनी धंगेकरांना निवडून देणाऱ्या मतदारांनीच आताच्या विधानसभेला १९ हजार ४१३ मतांनी त्यांना नाकारले. पहिल्या फेरीत धंगेकर यांना ६०० मतांची आघाडी मिळाली. ती टिकेल असे कोणालाच वाटत नव्हते व तसेच झाले. दुसऱ्या फेरीपासूनच रासने आघाडीवर गेले ते अखेरपर्यंत कायम राहिले.
विजयाबद्दल आपण काय सांगाल?
हेमंत रासने - पोटनिवडणुकीत पराभव झाला तरी त्याचा परिणाम मी माझ्या कामावर होऊ दिला नाही. शब्दश: दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो होते. संपर्क कार्यालये सुरू केली. तिथे नियमित जाणे सुरू केले. कोणाला खोटे वाटेल, पण ती निवडणूक आणि आताची ही निवडणूक या काळात मी तब्बल ५० हजार लोकांची लहानमोठी कामे केली. त्यांच्याबरोबर संपर्क केला. त्याचाच परिणाम म्हणजे हा विजय आहे.
विजयानंतर प्रमुख आव्हाने काेणती वाटतात?
हेमंत रासने - आता मला माझ्या मतदारसंघाची पूर्ण कल्पना आहे. मध्यवस्तीत असणाऱ्या या मतदारसंघात अनेक समस्या आहेत. त्यामुळेच माझ्या मतदारसंघाचे एक व्हिजनच मी तयार केले आहे. आता तज्ज्ञांच्या साहाय्याने त्यात काही सुधारणा करून सदर आराखडा परिपूर्ण करणार आहे. त्यादृष्टीने पावलं टाकणार आहे. यात जुन्या वाड्यांचा पुनर्विकास ते वाहतुकीच्या नियंत्रणापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यालाच माझे प्राधान्य असेल. यावर ही अर्थातच कामही सुरू केले आहे.
विजयाचे श्रेय काेणाला द्याल?
हेमंत रासने - पक्ष, पक्षाचे नेते व पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मला मोलाचे सहकार्य झाले. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला. नेत्यांनी मला जबाबदारी दिली आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढायचा आहे, या जिद्दीने दिवसरात्र माझे काम केले. घराघरांत जाऊन पक्षाचा विचार पोहोचविणे ही सोपी गोष्ट नाही. ती आम्हाला करता आली. त्यातून मतदारांना विश्वास मिळवता आला. आता त्या विश्वासाला पात्र राहणे, काम करणे, जनहिताचे विषय, योजना पुढे आणणे ही माझी जबाबदारी आहे. ती मी पार पाडणारच आहे.