पुणे : ज्या कसब्यात सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवायला जाताना अंगावर शेणगोळे झेलले, त्याच कसब्यात सन १९७२ मध्ये लीलाताई मर्चंट नावाची एक सर्वसामान्य कुटुंबातील महिलाआमदार म्हणून निवडून आली. नियतीने घडवून आणलेल्या या बदलामागे महिलांना सार्वजनिक जीवनात आणून त्यांना प्रतिष्ठा देण्याच्या संघर्षाचा फार मोठा इतिहास आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघ हे पुण्याचे हृदय आहे. सन १९७२च्या विधानसभा निवडणुकीतही ते होतेच. लीला मर्चंट या काही कोणी फार मोठ्या राजकीय नेत्या नव्हत्या. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने शालेय वयातच स्वत:ला त्यांनी सामाजिक कामात झोकून दिले होते. विवाहानंतर त्या पुण्यात आल्या, सामाजिक कार्य सुरूच होते. काँग्रेस हा त्यांचा पक्ष. बुधवार पेठ ही कर्मभूमी. तेथील महिलांसाठी त्या शिक्षण, आरोग्यविषयक अशी बरीच कामे करायच्या. काँग्रेसच्या वरिष्ठांपर्यंत त्यांचे हे काम पोहोचले. त्यामुळेच त्यांना नगरसेवक केले गेले. त्यांचा थेट इंदिरा गांधी यांच्याबरोबर संपर्क होता. पुण्यातील दौऱ्यात त्यांनी लीलाताईंनाच बरोबर घेतले होते.
दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर त्यांना १९७२ मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. त्यांच्यासमोर होते त्यावेळच्या संयुक्त समाजवादी पार्टीचे रामभाऊ वडके. जनसंघाचे नारायण वैद्य. शिवसेनेचे काका वडके. कम्युनिस्ट पार्टीचे वसंत तुळपुळे, संघटना काँग्रेसचे संपतलाल लोढा. एकूण आठ उमेदवारांमध्ये लीलाताई एकट्या महिला होत्या. त्या निवडून यायला हव्यात, असे थेट इंदिरा गांधी यांनीच स्थानिक पदाधिकाऱ्यांना बजावले होते. त्यामुळे ते सगळे एकदिलाने लीलाताईंचा प्रचार करत होते.
कसब्यातील त्यावेळच्या मतदारांची एकूण संख्या होती अवघी ६७ हजार ६७९. वैध मतांची संख्या झाली ४७ हजार १४८. त्यातील २३ हजार ५८६ मते लीलाताईंना मिळाली. रामभाऊ वडके यांना केवळ ८ हजार ९८७ मतांवर समाधान मानावे लागले. १४ हजार ५९९ मतांचा लीड घेऊन लीलाताई या निवडणुकीत विजयी झाल्या. पुणे शहरातील त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या. आमदारकीची पाच वर्षे त्यांनी बरेच काही काम करून प्रामाणिकपणे काढली. पुढे त्यांनी राजकीय निवृत्ती स्वीकारली. आजही जुन्या पिढीतील कसब्यातील लोक त्यांचे नाव काढतात. त्यानंतर मात्र कसब्यात महिलेला उमेदवारी मिळायला व विजयी व्हायला थेट सन २०१९ उजाडावे लागले.
तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या व महापौरपद भूषविलेल्या मुक्ता टिळक यांच्याकडे भाजपची उमेदवारी चालत आली. त्याआधी पुण्यात पर्वती, कोथरूड या मतदारसंघातून महिला आमदार झाल्या होत्या. लीलाताई मर्चंट यांनी घालून दिलेली पायवाट मळली होती. पण मर्चंट यांच्याच विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा महिलेला संधी मिळावी याला महत्त्व होते. मुक्ता टिळक याही विजयी झाल्या. दुर्दैवाने त्यांची आमदारकीची कारकीर्द अल्प ठरली. त्यांचे निधन झाले.
जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार
स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून पहिल्या महिला खासदार म्हणून इंदिरा मायदेव निवडून आल्या होत्या. त्यांचा मतदारसंघ पुणे ग्रामीण होता, मात्र त्या पुणे शहरातील व तत्कालीन कसब्यातील रहिवासी होत्या. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असलेल्या इंदिरा मायदेव यांनीही पाच वर्षे खासदार म्हणून दिल्लीत अतिशय यशस्वीपणे काम केले. पंडित नेहरूंपासून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यापर्यंत अनेकांबरोबर त्यांचा स्नेह होता. पुण्यात त्यांनी त्यांचे दौरे घडवून आणले. त्यांनीही पुढे राजकारणातून निवृत्ती घेतली.