पुणे - ओबीसी आरक्षण आणि इतर कारणास्तव महापालिका निवडणुकांसाठी सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेतच सर्व राजकीय पक्ष आहेत. मात्र, पुण्यातील दोन आमदारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मतदारसंघात पोटनिवडणुकांचे बिगुल वाजले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत. आता, या दोन्ही उमेदवारांना आव्हान देण्यासाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले कसब्याच्या मैदानात उतरले आहेत. यावेळी, त्यांनी नेहमीच्या स्टाईलने माध्यमांशी संवाद साधला.
अभिजित बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता यांनी काही दिवसांपूर्वीच कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्यानंतर आज अभिजित बिचुकले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन रितसर उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, बिचुकले यांनी माध्यमांशी संवाद साधला. जोपर्यंत मी विधानभवनात किंवा संसदेत जात नाही, तोपर्यंत निवडणूक लढणं हे मला भाग आहे. मी दोन वर्षांपासून कसबा पेठेत राहतोय. मग येथील लोकांचे प्रश्न माझे नाहीत का? मध्यंतरी 'कसबा भकास झाला' असे काही बॅनर्स लागले होते. त्याच भकास झालेल्या कसब्याला सजवायला मी येत आहे, असा विश्वास बिचुकले यांनी यावेळी व्यक्त केला.
कसब्यातील दोन्ही उमेदवार कोट्यधीश
कसबा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजप आणि महाविकास आघाडीचे दोन्हीही उमेदवार कोट्याधीश असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून समोर आले आहे. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण ८ कोटी ३६ लाख १० हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. दोन दुचाकी, २५ तोळे सोने आहे. तसेच धंगेकर यांच्या नावे ३५ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज, तर पत्नीच्या नावावर ३२ लाख ८ हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्यावर एकूण नऊ प्रलंबित खटले आहेत.
हेमंत रासने आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे १४ कोटी ७३ लाख ३९ हजार ७२० रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे, तर ३ कोटी ८० लाख ५६ हजार ६७७ रुपयांचे कर्ज रासने आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. रासने यांच्याकडे एक इनोव्हा कार आणि एक दुचाकी वाहन आहे.