पिंपरी : कोरोनामुळे वैद्यकीय आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. या संकटकाळात डॉक्टरांबरोबरचवैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली. या संकटात कोणी काम करायला तयार नव्हते, तेव्हा जम्मू काश्मीरमधील चार वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची सेवा केली.
हसीब खाजीर, अदील हुसैन, मलिक कुमार, आबिद हुसैन या चार युवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये सप्टेंबरपासून नर्सिंग स्टाफमध्ये काम केले. रुग्णसंख्या कमी झाल्याने हे कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन शहरे कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट बनली होते. अशा संकट काळात चार काश्मिरी युवक मदतीला धावून आले. पाच महिने रुग्णांची सेवा केल्यानंतर आता येथून जाण्याची वेळ आली. त्यामुळे कर्मचारी भावूक झाले होते. पीपीई किट घालून रोज ८ ते १२ तास या कर्मचाऱ्यांनी काम केले. हे चारही युवक मूळचे काश्मीरचे असून, त्यांनी नर्सिंगचे शिक्षण पंजाब येथून घेतले आहे. कोविड सेंटरचे कंत्राट खासगी कंपन्यांना दिले होते. खासगी कंपनीने त्यांची नेमणूक केली होती.
हसीब खाजीर म्हणाले की, माझा मित्र पुण्यात असतो. त्याने मला इकडे काम असल्याचे सांगितले. मी सप्टेंबरमध्ये येथे आलो. इथला अनुभव चांगला होता. या अगोदर रुग्णालयात काम केले आहे. कोविड सेंटरमध्ये खूप शिकायला मिळाले. अतिदक्षता विभागातील रुग्ण कसे हाताळायचे हे इथे शिकायला मिळाले. पाच महिन्यांच्या काळात इथे नवीन मित्र-मैत्रिणी भेटल्या. आता हे सगळं सोडून जायचं आहे. त्यामुळे दु:ख होत आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांची सेवा करायला मिळाली, याचे समाधान आहे.
अचानक काम बंद झाल्याने वाईट वाटतेकोविड सेंटर बंद करा अशा सूचना गुरुवारी देण्यात आल्या. काही दिवस अगोदर सांगायला पाहिजे होते. बाहेरील राज्यातून आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमधून कामासाठी येथे अनेक कर्मचारी आले आहेत. त्यामुळे त्यांना पूर्वसूचना देणे गरजेचे होते. डिसेंबरचा पगार अजून दिलेला नाही. त्यामुळे घरी जायला पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न काही कर्मचाऱ्यांना पडला आहे.