पुणे : जम्मू आणि काश्मीर हे पर्यटकांसाठी स्वर्ग आहे. काश्मीरची संपूर्ण अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनामुळे इथल्या लोकांना रोजगार मिळतो, सन्मान मिळतो. काश्मीरमधील पर्यटन व्यवसाय वाढला तर इथली अस्थिरता कमी होऊन शांतता नांदेल, असे सांगत काश्मीरला भेट देण्याचे आवाहन जम्मू आणि काश्मीर पर्यटन विभागाचे मुख्य सचिव फारूक अहमद शाह यांनी केले.सरहद संस्थेच्या पुढाकाराने जम्मू-काश्मीर पर्यटन विभाग व पुण्यातील पर्यटन व्यावसायिक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज (शनिवारी) ‘काश्मीर महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, त्यानिमित्त घेण्यात आलेल्या या बैठकीत जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाचे संचालक महंमद शाह, जम्मू-काश्मीर केबल कार कॉर्पोरेशनचे संचालक शमीम वाणी, सरहदचे अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर तसेच पुण्यातील पन्नासहून अधिक पर्यटन व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शाह म्हणाले, जम्मू आणि काश्मीरला पर्यटक इथे येण्यासाठी कायमच उत्सुक असतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी स्पेशल फोर्स तैनात करण्यात आली आहे. वैष्णोदेवीचे दर्शन घेण़्यासाठी यंदा १ कोटी तर अमरनाथ यात्रेसाठी १० लाख भाविक आले होते. मात्र कोणत्याही पर्यटकाला त्रास झालेला नाही. अशीच काळजी सगळ्याच पर्यटनस्थळांवर घेतली जात आहे.
पर्यटनवाढीनेच काश्मिरात शांतता
By admin | Published: February 25, 2017 2:34 AM