काटेवाडी : निरा डावा कालवा अस्तरीकरणाचे काम सुरु झाल्याने काटेवाडीचे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.सुरु झालेले काम पहिल्याच दिवशी शेतकºयांनी बंद पाडले.आता हे काम कायम बंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट मुंबईतील अजित पवारांचे देवगिरी निवास्सथान गाठले.सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या बाबत चर्चा केली.
मागील दोन दिवसांपूर्वी निरा डावा कालवा अस्तरीकरणाचे काम सुरू असल्याचे माहिती मिळताच काटेवाडीतील शेतकऱ्यांनी मोठा विरोध करून काम बंद पाडले. निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण होऊ द्यायचे नाही वेळप्रसंगी मोठा लढा देण्याचीही तयारी केली आहे. अस्तरीकरणामुळे पाझर बंद होऊन कुंपणलिका विहिरीच्या पाणी पातळीवर परिणाम होऊन मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे अस्तरीकरण रोखण्यासाठी काटेवाडीतील शेतकरी एकवटला आहे त्यांनी थेट देवगिरी बंगला गाठला. उपमुख्यमंत्री पवार यांची सोमवार ( दि१७ ) रोजी सकाळी सात वाजता काटेवाडीतील शेतकऱ्यांनी भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यांनी सर्व परिस्थिती सांगितली. त्यावर पवार यांनी सुरुवातीला समजूत घालण्याचा प्रयत्न केला. बाबांनो हे काम पाठीमागेच भाजप सरकारच्या काळात सुरू झाले आहे. आपल्या काळात हे काम सुरु न झाल्याचे स्पष्ट केले. मात्र अस्तरीकरणामुळे खरोखरच पाझर बंद होणार आहे, पाणी पातळी घटणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिथे विरोध आहे तेथील काम थांबविण्याची सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी चर्चेदरम्यान केल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांना भेटलेल्या काटेवाडीतील शेतकºयांनी ‘लोकमत ’शी बोलताना सांगितली. या चर्चेदरम्यान पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी अर्धा तासाहून अधिक वेळ गाववाल्यांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली.त्यानंतर सर्वांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेत या अस्तरीकरणाची माहिती दिली.